Crime | बुजगावण्याने घातला सरकारी वेळ वाया; यंत्रणा लावली कामाला

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

राहुरी | ५ जुलै | प्रतिनिधी

(Crime) तालुक्यातील मुळा धरण परिसरातील एका ओढ्यात पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पँट-शर्ट घातलेल्या पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आपल्या पथकासह तेथे धाव घेतली. तोपर्यंत घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.

 

(Crime) कोणाचा मृतदेह असेल? खून असेल की आत्महत्या? येथे कसा आला असेल? यावर ग्रामस्थ चर्चा करीत होते. दूरच उभे राहून तर्कविर्तक लढविले जात होते.

 

(Crime) पोलिस घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थ आणि पोलिसांना पाण्यात उतरवून मृतदेह बाहेर काढण्यास सांगितले. पंचनाम्याची तयारी झाली. मात्र, जेव्हा हा मृतदेह बाहेर आणला, तेव्हा सगळ्यांनाचा धक्का बसला.

 

 कारण तो कोणा माणसाचा मृतदेह नव्हता, तर शेतातील बुजगावणे होते. शेतात पक्षी, वन्यप्राणी येऊन पिकांचे नुकसान करू नयेत, यासाठी शेतकरी हुबेहुब माणसांसारखी दिसणारी बुजगावणी तयार करतात. असेच हेही बुजगावणे होते. काम संपले म्हणून कोणा शेतकऱ्याने ते काढून टाकले असावे आणि पावसाच्या पाण्याने येथे वाहून आले. संबंधितांनी पोलिसांना खबर दिली चांगली गोष्ट. मात्र, थोडीफार खातरजमा केली असती तर हा प्रसंग टळला असता.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *