राहुरी | १९ जून | प्रतिनिधी
संपुर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासह राहुरी तालुका व परिसरात वाळू माफिया, मुरूम माफिया व गौण खनिज माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे. याचा अतिरेक आज खडांबे खुर्द गावात दिसून आला, जेव्हा स्थानिक भिल्ल आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीतच अवैधरित्या उत्खनन करण्यात आले. या ठिकाणी गाडण्यात आलेल्या मृतदेहांचे अवशेष विखुरले गेले. मृतांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा हा घोर अपमान असल्याचे सांगत, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
घटनास्थळी उपस्थित राहून त्यांनी संतप्त नागरिकांच्या भावना ऐकून घेतल्या आणि प्रशासनाची झोप उडवणारा सवाल उपस्थित केला. “या उत्खननासाठी वापरलेल्या डंपर व जेसीबींवर क्रमांक प्लेटच नव्हत्या. सामान्य माणसांवर तत्काळ कारवाई करणारे वाहतूक पोलिस असेवेळी कुठे असतात?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “या प्रकाराबाबत यापूर्वीही मी अनेक वेळा तत्कालीन तहसीलदारांकडे तक्रार केली होती. मात्र केवळ किरकोळ कारवाई झाली आणि माफियांना मोकळे रान मिळाले. आजच्या घटनेमुळे त्याचे गंभीर परिणाम आपल्यासमोर आहेत.”
प्राजक्त तनपुरे यांनी इशारा दिला की, “अशा बेकायदेशीर आणि अमानवी कृत्यांवर जर त्वरित ठोस कारवाई झाली नाही, तर आम्हाला अधिक तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल. हा केवळ स्मशानभूमीचा अपमान नाही, तर संपूर्ण समाजाच्या संवेदनांचा अपमान आहे.”
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेऊन प्रशासनाने संबंधित वाहनांवर आणि उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमलेले नागरिक आणि ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त करत, अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.

