(Business) राज्यातील युवक युवतींना उद्योगक्षेत्रात रोजगारक्षम बनवण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री रोजगार व कौशल्य विकास पॅकेजअंतर्गत ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना’ चालू केली. या योजनेच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत एक कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.
(Business) विविध नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार व कौशल्यांनुसार अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त रविकुमार पंतम यांनी केले.
(Business) योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे २ हजार कंपन्यांसोबत करार करण्यात आले असून, सहभागी होणाऱ्या प्रत्येक इंटर्नला कामावर रुजू होताना एकरकमी ६ हजार रुपये, तसेच पुढील ९ महिन्यांसाठी प्रतिमहिना ५ हजार रुपये (केंद्र सरकारचे ४,५०० व कंपनीचे ५०० रुपये) असे वार्षिक अनुदान दिले जाणार आहे. यामुळे युवकांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभवासह आर्थिक साहाय्यही मिळणार आहे.
ही योजना विशेषतः शिक्षण पूर्ण केलेल्या किंवा सध्या रोजगारात नसलेल्या बेरोजगार युवक युवतींसाठी उपयुक्त ठरणार. यासाठी वयोमर्यादा २१ ते २४ वर्षे अशी निश्चित करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांसाठी या योजनेअंतर्गत सुमारे २१७ पदांची संधी उपलब्ध आहे.