रत्नागिरी | ७.५ | रयत समाचार
(Biodiversity) रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्याचे उत्खनन करण्यात आले आहे. याच खोदकामाचा फटका एका रानगव्याला बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ता.६ मे रोजी रात्री उशिरा रस्ता पार करत असताना खोलीचा अंदाज न आल्याने रानगवा जवळपास ३० फूट खोल दरडीवरून खाली कोसळला. या अपघातात त्याच्या मणक्यात व पायात फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापती झाल्या आहेत.
(Biodiversity) घटनेनंतर गव्यास कोणतीही शारीरिक हालचाल करता येत नसल्याने तो रात्रभर जखमी अवस्थेत खालीच पडून होता. सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
(Biodiversity) दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे रत्नागिरी दौऱ्यावर जात असताना त्यांनी घटनास्थळी थांबून संपूर्ण घटनेची पाहणी केली. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या तसेच जखमी गव्याच्या उपचाराबाबतही माहिती घेतली.
या घटनेबाबत संताप व्यक्त करताना स्थानिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदारांच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. महामार्गालगत तब्बल ३० फूट खोदकाम करण्यात आले असताना योग्य सुरक्षात्मक कठडे, इशारा फलक किंवा संरक्षक व्यवस्था उभारण्यात आली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.
वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसह नागरिकांच्या जीवितालाही अशा निष्काळजी कामांमुळे धोका निर्माण होत असल्याने संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची, मागणी आता जोर धरू लागली आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.

