Ipl

Art | उजेडाच्या वाटा : स्त्रीशक्तीच्या कथा सांगणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाला मुदतवाढ

SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | १०.३ | रयत समाचार

(Art) महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे आयोजित करण्यात आलेले प्रसिद्ध छायाचित्रकार, अभ्यासक व लेखक संदेश भंडारे यांच्या ‘उजेडाच्या वाटा’ या महिलांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाला प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ता. १२ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे हे प्रदर्शन आता मंगळवारी १० मार्च आणि बुधवारी ११ मार्च रोजीदेखील प्रेक्षकांसाठी खुले राहणार आहे.

(Art) पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाट्यगृह, कलादालनात ५ ते ८ मार्च या कालावधीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील कला रसिक, सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटना आणि अभ्यासक यांचा मोठा प्रतिसाद लाभला. या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर तसेच विविध संस्था-संघटनांच्या मागणीनुसार प्रदर्शनाची मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(Art) ‘उजेडाच्या वाटा’ या प्रदर्शनात महाराष्ट्रासह विविध भागांतील स्त्रियांचे वास्तव जीवन अत्यंत प्रभावी पद्धतीने छायाचित्रांमधून मांडण्यात आले आहे. वेगवेगळ्या आर्थिक व सामाजिक स्तरांतील महिलांचे संघर्ष, जिद्द, परंपरागत कामांबरोबरच चौकट मोडून नवीन जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या स्त्रियांची कहाणी या छायाचित्रांतून उलगडते. प्रत्येक छायाचित्र जणू एक कथा सांगत असल्याचा अनुभव प्रेक्षकांना येथे मिळतो.

- Advertisement -
Ad image

स्त्रियांच्या बदलत्या भूमिकांचा आणि समाजातील त्यांच्या सकारात्मक स्थानाचा वेध छायाचित्रांच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी या प्रदर्शनातून केला आहे.

महिला जीवनातील संघर्ष, जिद्द आणि परिवर्तनाचा वेध घेणारे हे प्रदर्शन पाहण्यासाठी कला रसिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share This Article