अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक एकोप्याला आणि समर्पणाला मिळते नवी दिशा
अहमदनगर | २३ डिसेंबर | प्रतिनिधी
(Cristmas 2024) पीस फाउंडेशनच्या वतीने नाताळ सणाचे औचित्य साधून ग्रामीण भागात सेवाकार्य करणाऱ्या याजकांच्या सेवेला सलाम करण्यासाठी खास कृतज्ञता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचा उद्देश त्यांच्या सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करणे, तसेच त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे हा होता.
(Cristmas 2024) कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. यावेळी विविध चर्चच्या याजकांनी एकत्र येऊन नाताळ सणाचा खरा अर्थ समजून घेतला. प्रमुख अतिथी म्हणून सी.एन.आय. नाशिक धर्मप्रांताचे बिशप राईट रेव्हरंड दरबारा सिंग उपस्थित होते, यावेळी बूथ हॉस्पिटलचे प्रशासक देवदान कळकुंभे, रेव्ह.जे.आर.वाघमारे, डॉ.मार्क सोनवणे, सॅम्युअल वाघमारे, डॉ.विजय संसारे यांच्यासह ग्रामीण भागातील याजक उपस्थित होते. यावेळी बिशप दरबारा सिंग यांच्या हस्ते याजकांना भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.
आपल्या मनोगतात बिशप दरबारा सिंग म्हणाले, नाताळ सण हा केवळ साजरा करण्याचा नाही तर इतरांच्या जीवनात प्रकाश आणि आनंद निर्माण करण्याचा उत्सव आहे. येशू ख्रिस्ताने आपले जीवन समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले. देवाचा पुत्र असूनही त्याचा जन्म एका लहानशा गायीच्या गोठ्यात झाला, ज्यातून त्याने नम्रता, त्याग आणि दयाळूपणाचा संदेश दिला. आज आपण त्याच विचारांची आठवण ठेवून इतरांच्या आनंदात सहभागी होणे महत्त्वाचे आहे. नाताळ सण देवाने मनुष्यावर केलेली प्रीती व त्याग याचे प्रतीक मानले जातो. त्यामुळे नाताळ सणाचा खरा अर्थ हा इतरांच्या सेवेमध्ये आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
रेव्ह.जे.आर.वाघमारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पीस फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.मार्क सोनवणे यांचे वडील स्वर्गीय रेव्ह.एल.बी. सोनवणे हे देखील एक याजक होते, त्यांनी अनेक वर्ष ग्रामीण भागात सेवाकार्य केले. त्यांनी नेहमीच इतरांची मदत केली. ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक बाबतीत सहकार्य केले. त्यांचे इतर सहकारी याजकांना सहकार्य असायचे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला त्यांचे अनेक बाबतीत आशीर्वाद मिळाले, स्व.रेव्ह.एल.बी.सोनवणे यांचे हे कार्य डॉ.मार्क सोनवणे पुढे घेऊन जात आहेत, त्यामुळे या भेटवस्तूंचे नियोजन पीस फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.मार्क सोनवणे यांनी स्वखर्चाने केले.
पीस फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.मार्क सोनवणे यांनी आपल्या भाषणात सांगितले, ग्रामीण भागातील याजक हे खऱ्या अर्थाने समाजाचे आधारस्तंभ आहेत. ते फक्त अध्यात्मिक मार्गदर्शन करत नाहीत, तर अनेकदा गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावतात. देवाच्या सेवकांच्या या कार्याची कृतज्ञता व्यक्त करणे हा नाताळ सणाचा खरा आनंद आहे. त्यांच्या सेवेला कृतज्ञतेने सन्मानित करणे हे आमचे कर्तव्य आहे.
डॉ.मार्क सोनवणे यांनी आपल्या वडिलांचे, स्व.रेव्ह.एल.बी.सोनवणे यांचे स्मरण केले. त्यांनी ग्रामीण भागात केलेल्या सेवाकार्याची माहिती देत त्यांच्या समाजसेवेच्या वारशाला पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंभे यांनी पीस फाउंडेशनच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले, ग्रामीण भागातील याजकांसाठी अशा प्रकारच्या सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करणे ही कौतुकास्पद बाब आहे. पीस फाउंडेशनने जेष्ठ नागरिक, महिला आणि वंचित घटकांसाठी केलेले काम प्रेरणादायी आहे. या कार्याला बूथ हॉस्पिटलकडून नेहमीच आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल.
कार्यक्रमात प्रार्थना व संदेशाद्वारे नाताळ सणाचे महत्त्व उलगडण्यात आले. ग्रामीण भागातील याजकांनीही आपल्या अनुभवांचे आणि सेवाकार्याचे विचार कथन केले, ज्यामुळे कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीस फाउंडेशनचे सचिव सॅम्युअल वाघमारे यांनी केले. त्यांनी फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आभार डॉ.विजय संसारे यांनी मानले.
हा कृतज्ञता कार्यक्रम ग्रामीण भागातील याजकांसाठी एक संस्मरणीय पर्व ठरला. अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक एकोप्याला आणि समर्पणाला नवी दिशा मिळते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. पीस फाउंडेशनचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरतो, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर