politics: डाव्या पक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल - शरदचंद्र पवार; भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा महाविकास आघाडीकडे १६ जागांचा प्रस्ताव; शिष्टमंडळाची खा.पवार यांच्यासोबत मुंबईत चर्चा - Rayat Samachar

politics: डाव्या पक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल – शरदचंद्र पवार; भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा महाविकास आघाडीकडे १६ जागांचा प्रस्ताव; शिष्टमंडळाची खा.पवार यांच्यासोबत मुंबईत चर्चा

रयत समाचार वृत्तसेवा
73 / 100

मुंबई | २० ऑगस्ट | प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यातील १६ मतदारसंघात निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. या १६ जागांचा प्रस्ताव भाकपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचे politics नेते खा. शरद पवार यांना भेटून दिला. महाविकास आघाडीने निवडणुकीचे जागावाटप करताना या १६ जागांचा विचार करुन, त्यापैकी असलेल्या जागा भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सोडाव्यात, अशी मागणी यावेळी भाकपच्या नेत्यांनी केली.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीचे नेते खा. शरद पवार यांची भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉ.डॉ.भालचंद्र कानगो व राज्य सेक्रेटरी कॉ.ॲड.सुभाष लांडे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत पक्षाचे राष्ट्रीय नेते कॉ.सुकुमार दामले, राज्य सहसचिव कॉ.राजू देसले, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.शाम काळे, मुंबईचे सेक्रेटरी कॉ.मिलिंद रानडे, कॉ.अशोक सूर्यवंशी उपस्थित होते.

यावेळी भाकपच्यावतीने राज्यातील १६ जागांचा प्रस्ताव देत, जागावाटपाची चर्चा करताना भाकपसह सर्वच डाव्या पक्षांना योग्य सन्मान देऊन महाविकास आघाडीत सहभागी करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत खा. पवार यांनी डाव्या पक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल, असे सांगितले.

दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जातनिहाय जनगणना व्हावी, तसेच आरक्षणासाठीची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवावी या मागणीसाठी देशव्यापी मोहिम सुरु केली आहे. याअंतर्गंत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जातनिहाय जनगणना परिषदा घेण्यात येत असून, ता.६ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे भाकपच्यावतीने राज्यव्यापी जातनिहाय जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी खा. शरद पवार यांना यावेळी निमंत्रण देण्यात आले.

VIRAJ TRAVELS
Ad image

तसेच पक्षाचे दिवंगत राष्ट्रीय नेते कॉ. ए.बी.बर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपूर येथे भव्य कामगार मेळावा आयोजित करण्यात येणार असून, या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे खा. शरद पवार यांनी मान्य केले.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
Leave a comment