father:फ्रान्सिस दिब्रिटो : मेल्सीना तुस्कानो यांची स्मृतिवार्ता वाचा - Rayat Samachar

father:फ्रान्सिस दिब्रिटो : मेल्सीना तुस्कानो यांची स्मृतिवार्ता वाचा

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
59 / 100

स्मृतिवार्ता | मेल्सीना तुस्कानो, नंदाखाल

फ्रान्सिस दिब्रिटो

वसईच्या मातीत एक चमकते रत्न जन्मले,
फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्या नावाने ओळखू लागले,

अस्सल मराठमोळ्या साहित्यसेवकाचे व्यक्तिमत्व ही मराठीच,
मधाळ, रसाळ मराठी भाषा कायम त्यांच्या तोंडीच,

इंग्रजी ही भाषा धनाची अन् मराठी भाषा ही मनाची,
यातूनी वाट काढली त्यांनी साहित्यक्षेत्राची,

जीवन अर्पिले त्यांनी परमेश्वराच्या पवित्र मळ्यात,
अन् वाहून घेतले स्वतःला सामाजिक कार्यात,

वसईच्या मातीचे ते धर्मगुरू ख्रिश्चन लोकांचे,
पण सर्वधर्मसमभाव ह्या पक्क्या विचारांचे,

विविध विषयाचें मराठीत दांडगे लेखन प्रकाशित त्यांचे,
समाजसेवा अन् साहित्यसेवा हे विषय हातखंडाचे,

ओळख त्यांची ज्येष्ठ- श्रेष्ठ साहित्यिक अन् पर्यावरणाचे रक्षणकर्ते,
समाजाचे सुजाण जागृत कर्तृत्ववान वक्ते,

हुशार, चाणाक्ष परखड त्यांचे व्यक्तिमत्त्व,
कायम लोकांना देई जीवन जगण्याचे तत्व,

अन्यायाविरुद्ध वाचा फोडून समाजासाठी झटणारे,
आपल्या धारधार लेखणीतूनी झोपलेल्यानां उठवणारे,

हा कोणता धर्म अन् ही कोणती जात हे न म्हणता,
कायमचे लढत ते लोकांच्या ऐक्यासाठी चालता बोलता,

ख्रिश्चन असूनही अभ्यास त्यांचा महाराष्ट्रातील हिंदू संतांवरी,
आले नाव त्यांचे राज्य शासनाच्या ज्ञानोबा तुकोबा पुरस्कारावरी,

पोहचवली त्यांनी ख्रिश्चनांच्या पंढरीत गाथा तुकोबा महाराजांची,
देऊनी संदेश सर्वांना ही माती आहे सर्वधर्म समभावाची,

ठेवीली तेवत त्यांनी वात समाजप्रबोधनाची,
मनी आस एकच ह्या समाजाला एकत्र आणण्याची,

मिळे त्यांच्या प्रवचनातून झणझणीत अंजन समाजाला,
अनेक मासिके, वर्तमानपत्रातून मिळे त्यांचे लेखन वाचायला,

प्रसिद्ध झाले ग्रंथ सृजनाचा मळा अन् ऑसोसिसच्या शोधात,
सामोरी आणली संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची फादरांनी समाजात,

आले ते लोकांच्या सामोरे एबीपी माझा, न्यूज लोकमत ह्या माध्यमातूनी,
झाली देवाणघेवाण विषयांची एकमेकांच्या विचारांतूनी,

संपादक म्हणूनी केले कार्य अनेक वर्षे सुवार्ता मासिकाचे,
अन् पुण्यात पंधराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनात अध्यक्षपद मानाचे,

उभारली एक चळवळ हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातूनी,
अन् एकत्र आणिले त्यांनी समाजाला अन स्वतःला
साहित्य सामाजिक उपक्रमातुनी,

लिहूनी मराठीत सुलभ भाषेत सुबोध बायबल-जुना नवा करार,
मिळाला 2013 साली साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार,

श्रेष्ठ साहित्यिक म्हणूनी झाला पुण्यात त्यांचा विशेष सन्मान,
मिळाला प्राचार्य शिवाजीराव भोसले पुरस्कारातून त्यांना मान,

गौरविण्यात आले पुण्यात डॉ. डी. वाय. पाटील यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊनी,
चालूच असे त्यांचे व्याख्याने कोल्हापूर अन सोलापूरच्या मातीत राहुनी,

ओळखलं खरं महत्त्व महाराष्ट्राच्या मराठीचं ह्या धर्मगुरूंनी,
ठेवले जीवीत आईच्या भाषेला आपल्या विचारांनी,

टिकावी ही हरित वसई म्हणून पाऊले उचलली कायम संघर्षाची,
समाजाच्या चांगल्या कार्यात मिळे त्यांना साथ पाठींब्याची,

सर्वत्र पेटली आग हिंसाचाराची म्हणून घ्या लाठी आध्यात्मिक महासत्तेची,
असे तडफदार बोलणे नजर खिळवी जनतेची,

महाराष्ट्रातील मुंबई, अन् मुंबईतील वसई गावातील धर्मगुरू साहित्यिक हे तर,
जन्मलेल्या मातीशी ठेवूनी इमान घेतली झेप साऱ्या महाराष्ट्रभर,

निवड होऊन अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात
वसईचा झेंडा फडकविला त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात

मिळाले साहित्यिकाच्या रूपाने अनमोल रत्न ह्या समाजवासीयांना,
करुनी मानाचा मुजरा साहित्यिक फादर दिब्रिटोंना

 

फादर तुमच्या जाण्याने फक्त वसईत नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात पोकळी निर्माण झाली आहे… तुमचे कार्य, तुमची शिकवण आम्ही कायम स्मरणात ठेवू…मेल्सिना तुस्कानो, वसई

हे हि वाचा : paris olympic 2024:पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याने जगाला केले चकित

Share This Article
Leave a comment