पाथर्डी | राजेंद्र देवढे
परिसर समृद्ध होण्यासाठी नागरिकांनी पाझर तलावाची मागणी केली. मात्र या ठिकाणी जलजीवन मिशनचे गाजर दाखवले जात आहे. यामुळे गरज नसलेली व तांत्रिकदृष्ट्या अपयशी ठरणारी कामे जनतेच्या माथी मारण्यात येत आहेत. अशा बेजबाबदार कार्यपद्धतीमुळे फक्त ठेकेदारी पोसली जात असून स्वतःला मिरवून घेण्याचे उद्योग सध्या मतदारसंघात चालू असल्याची टीका माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी भाजपा आमदार मोनिका राजळे यांचा नामोल्लेख टाळून केली.
तालुक्यातील माणिकदौंडी, आल्हनवाडी, पत्र्याचा तांडा, घुमटवाडी, चेकेवाडी आदी गावामध्ये माजी आमदार घुले यांनी परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून परिसरातील जनतेशी संवाद साधला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आलमगीर पठाण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शाहिद पठाण, मच्छिंद्र गव्हाणे, संजय चितळे, रामेश्वर कर्डिले, भाऊसाहेब कर्डिले, उत्तम पवार, अश्फाक पठाण, अजिज पठाण, रवींद्र घोषीर, अश्पाक पठाण, सुनील पवार, कडूबाळ लोंढे, एजाज पठाण, शेखर भापकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना घुले पाटील म्हणाले की, या मतदारसंघातील लोकांनी मला एकदा संधी दिली. तेव्हा मी पन्नास वर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लावली. माणिकदोंडी येथे विद्युत उपकेंद्राची निर्मिती करून दुर्गम परिसरातील वाड्यावस्त्या व तांड्यांवर वीज आणली. पटेलवाडा तलावाची गळती पूर्णपणे थांबवत उंची वाढवून पाण्याची साठवण क्षमता वाढवली. डोंगर-दऱ्यांत रस्त्यांचे जाळे निर्माण केले. माझ्या पाच वर्षाच्या तुलनेत मागील दहा वर्षात झालेले काम बघितले तर आपणाला मोठा फरक दिसून येईल. मी केलेल्या कामांमुळे नागरिकांना आजही मूलभूत सुविधा मिळत आहेत. याउलट विद्यमान लोकप्रतिनिधींनी भ्रष्टाचाराचे कुरण निर्माण करुन निकृष्ट कामांच्या माध्यमातून ठेकेदारी पोसण्याचे काम चालवले आहे. प्रशासनावर कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही. यामुळे जनतेला कोणीही वाली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा मला संधी द्या. विकास कामांचा राहिलेला अनुशेष भरून काढू असे मा. आ. चंद्रशेखर घुले पाटील शेवटी म्हणाले.
अनावश्यक व चुकीच्या अनेक कामांबद्दल लोकप्रतिनिधींकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु, त्यांनी आमच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केले. गरज व नसलेली कामे केवळ टक्केवारीसाठी मंजूर केली. त्यामुळे गावाची प्रगती थांबुन अधोगतीच झाली आहे. आता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात मा. आ. चंद्रशेखर घुले पाटील यांना साथ देऊ.
मच्छिंद्र गव्हाणे – माजी सरपंच, आल्हनवाडी