मसापचा स्व. राजळे पुरस्कार : विकत घेतलेलं शहाणपण व पुरस्कारही - सुरेश पाटील - Rayat Samachar

मसापचा स्व. राजळे पुरस्कार : विकत घेतलेलं शहाणपण व पुरस्कारही – सुरेश पाटील

रयत समाचार वृत्तसेवा

साहित्यवार्ता | कोल्हापूर

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या अहमदनगर शाखेकडून माझी ‘स्व. राजीव राजळे स्मृती राज्यस्तरीय साहित्य साधना जीवन गौरव पुरस्कार २०२४’ (स्मृतिचिन्ह, अकरा हजार रुपये, वगैरे) साठी निवड झाली. माझ्याबरोबरच अन्य साहित्यिकांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, ही आनंदाचीच बाब. परंतु, या पुरस्काराच्या निमित्ताने घडलेला घटनाक्रम हा लाजिरवाणाच होता. तसेच ज्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात आला त्या नावाला कलंकित करणाराही. यानिमित्त आपली ऐपत नसेल तर पुरस्कारासारख्या उचापती करून भिकेचे डोहाळे लागल्यासारखे वर्तन करण्याचे ‘मसाप’सारख्या प्रतिष्ठित संस्थेला कारणच काय, असा प्रश्नही उपस्थित होतो. राज्यात साहित्य पुरस्कारांच्या बहाण्याने उद्योगपती, व्यावसायिक, राजकारणी, आदी घटकांचा गैरसमज करून देत स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्याची बेगडी प्रवृत्ती वाढली आहे. त्याचेच दर्शन अहमदनगरमध्येही झाले.
साहित्य क्षेत्रात सध्या मी ज्या पायरीवर उभा आहे, ते पाहता पुरस्काराचं आकर्षण किंवा पुरस्कार मिळाल्याने फुलारून जाण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय स्वकर्तृत्वावर अल्पावधितच निश्चित उंची गाठल्याने पुरस्कारासाठी पुस्तके पाठवणे, त्यासाठी विशेष प्रयत्न करणे असले गलिच्छ प्रकार करण्याचेही कारण नाही. ही बाब पुरस्कारप्राप्त अन्य साहित्यिकांच्या बाबतीतही लागू आहेच. मात्र, अनपेक्षितपणे या पुरस्कारासाठी माझे नाव पुढे आल्याचे व त्या अनुषंगाने राजकारण घडत असल्याचे कळले होते. साहित्य क्षेत्रातील कुणाचा तरी भाऊ असणं व त्याच्याकडून दबाव येईल असं काहीसं चित्र उभा करण्यात आलं होतं. मात्र, विरोधासाठी विरोध नसावा व साहित्यिक योगदान लक्षात घेऊनच अखेर माझं नाव निश्चित करण्यात आलं त्याबद्दल निवड समितीचे आभारच. मात्र, पुरस्कार स्विकारण्यास गेल्यानंतरचा अनुभव कमालीचा दाहक होता. पुरस्कार संयोजकांच्या योग्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाराही. असे अनुभव कोणत्याही साहित्यिकाच्या वाट्यास येऊ नये म्हणूनच…
आपल्या साहित्यिक योगदानाचा आदर, नवीन संबंध निर्माण होणे, असलेल्या संबंधांमध्ये दृढता येणे, काय चालले आहे याबाबतचे आकलन, माणसं कळणं, वैचारिक आदान-प्रदान आदी गोष्टी लक्षात घेऊनच कोणताही साहित्यिक एखादा पुरस्कार स्विकारण्यास जात असतो/अन् गेलंही पाहिजे. अशावेळी संबंधित साहित्यिकाची तिथं पोहोचण्यापासून निघेपर्यंतची जबाबदारी ही संयोजकांवरच असते व त्याने ती नीट पाळणे आवश्यक तसे अपेक्षितही असते, अन् तसे केलेही जाते. मात्र, इथं सर्वच गोष्टींना हरताळ फासण्यात आलेला.
आलेले विपरीत अनुभव –
१) रविवार दि. ७ जुलै रोजी हा कार्यक्रम होता व बाहेरगावाहून येणार्‍या साहित्यिकांची सोय कुठे करण्यात आली आहे, याबाबत घोर अंधारही. अखेर शुक्रवार दि.०५/०७/२०२४ रोजी मा. आ. स्व. राजीव राजळे साहित्य पुरस्कार या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शाखाध्यक्ष किशोर मरकड यांनी दुपारी १२:५० वाजता नगरमधील एका हॉटेलमध्ये व्यवस्था होईल व बाहेर गावाहून येणार्‍यांनी सिंगल रुमसाठी पंधराशे व डबल रुमसाठी दोन हजार रुपये मोजावे लागतील असा मेसेज पाठवला. शनिवार, रविवारी नगरची हॉटेल्स फुल होत असल्याने शुक्रवारीच हॉटेलवर फोन करण्याची सूचनाही होतीच. म्हणजे कोल्हापूरहून मी आठ-नऊ तासांचा प्रवास करून येणार अन् तिथं खिशातले रुपये टाकून स्वतःची राहण्याची व्यवस्था करण्याचा हा अजब सल्ला! शिवाय संयोजक येण्या-जाण्याचा खर्चही देणार नव्हते हे नंतर कळलं. मी अगोदरच कोंडुस्कर ट्रॅव्हल्सचं तिकिट बुक केलं होतं (कोल्हापूर-अहमदनगर रु.१२००/-). बरे, संयोजकांची बुद्धी इतकीच चालत होती, तर ती पुरस्कार प्रदान समारंभावेळी न चालता अगोदर आठवडाभर जरी चालली असती, अन् त्यांनी येण्या-जाण्याचा खर्च मिळणार नाही, बक्षिसाची रक्कम मिळणार नाही, असे सांगितले असते तर यायचे की नाही, हे आम्ही ठरवले असते. अर्थात, ज्यांना हे कळले त्या प्रतिथयशांनी तिकडे पाठ फिरवल्याचेही नंतर मला कळले.
मी अधिक चौकशी करता मरकड यांनी पुण्यातून कार्यक्रमास येणार्‍या एक-दोघांची नावे सांगितली. त्यांच्यासोबतही येऊ शकाल असाही अजब सल्ला होता. मी सहजच तिकडे येणार्‍या एका पुणेकराला शनिवारी सकाळी फोन केला. ते त्याच दिवशी नगरमध्ये मुक्कामाला येणार होते. त्यांचा समज झालेला की संस्थेनं स्वखर्चाने राहण्याची सोय केलेली आहे! त्यांनी राहण्याबाबत विचारले असता, मी त्यांना हॉटेलबाबत आलेल्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजची माहिती दिली. तेव्हा त्यांनी मी रविवारी सकाळीच निघतो असा निर्णय घेतला! (काय करतील बिचारे!) त्यांचंही खरं होतं… प्रवासखर्च नाही, राहण्याचा खर्च स्वतःच्या खिशातून करायचा. राहण्याबरोबर जेवण, वा इतर खर्चही असतोच. शिवाय स्वतःचा मोलाचा वेळ वाया घालवायचा, अन् मिळणार काय…! इतकी लबाडी, फसवणूक करण्यापेक्षा संयोजक/शाखाध्यक्ष हा पुरस्कार कुरियरनेही पाठवू शकत होते.
अधिक चौकशीमध्ये मरकड यांनी मला समारंभस्थळी म्हणजे कोहिनूर हॉलवर फ्रेश होण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले. शिवाय तिथं पोहोचायला ट्रॅव्हल्स गाडीतून कुठं उतरायचं हेही.
२) मी पहाटे सुमारे पावणेपाच वाजता अहमदनगरमधील हॉटेल महाराजाजवळ उतरलो. रस्ता सुनसान. भटक्या कुत्र्यांची भीती.(यापूर्वी दोन वेळा तरी मी रात्रीच्या वेळी असे त्यांना तोंड दिलेले. त्यामुळे त्याचं गांभीर्य होतंच.) साधारणतः वीस-पंचवीस मिनिटे तिथं काढल्यानंतर जवळच्याच हॉस्पिटलमधील वॉचमनच्या मदतीने मी कोहिनूर हॉलवर पोहोचलो. अशावेळी संयोजकांकडून कुणीतरी येणं अपेक्षित होतं व त्यात गैर असं काही नव्हतं.
३) हॉलमध्ये फक्त पलंग व गादी असलेली रुम. जवळच बाथरूम, टॉयलेटही. लग्नसमारंभाचा हॉल असल्याने ते एकवेळ आपण समजून घेऊ. शेवटी कार्यक्रम हा महत्त्वाचा असतो. तरी मधेच एका कर्मचार्‍याने रुम खाली करण्याबाबत सांगितलेच. दरम्यान, श्याम शिंदे आले. त्यांच्यासोबत मात्र तिथं नाष्टा-चहा झाला. ट्रॅव्हल्सच्या गाडीत सामान ठेवण्याच्या रॅकमध्ये पाणी घुसल्याने कपडे किंचित ओले होते. श्याम यांच्या सूचनेनुसार ते मी इस्त्री करून आणले. तोवर अक्षरवाङ्मयचे बाळासाहेब घोंगडेही आले. त्यांनी मात्र मी सोबत असतानाच स्वखर्चाने नाष्टा केला.
४) पुढे शाखाध्यक्षांची भेट झाली व ‘आपण आलात का.. वा..’ असा संवाद होऊन, तुम्हाला पुरस्काराच्या पैशाची काय आवश्यकता आहे… अशा स्वरूपाचं पुरेपूर कोडगेपणा भरलेलं पुढचं वाक्य आलं. त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या इसमाने ‘अरे असं कसं!’ असं आश्चर्य व्यक्त केल्याचं माझ्या कानावर आलं. तेवढ्यात ‘कार्यक्रमाचा खर्च खूप आहे. कसं मॅनेज करायचं. पाकिटातील रक्कमही आम्ही इकडंच तिकडंच गोळा करून..’ वगैरे दोन-तीन वाक्ये माझ्या कानावर पडली. निगरगट्टपणाचा कळस असलेली ही वाक्ये ऐकून मला अक्षरशः धक्का (stun) बसला. पुढे पुरस्काराचा स्विकार करताना मानपत्र, स्मृतिचिन्ह व कुणीतरी एक छोटासा लखोटा पुढे केला. तो घेत असतानाच ‘अरे, त्यांच्याकडे कशाला? माझ्याकडे ते द्यायचं नाही का!’ अशा स्वरूपाची संयोजकांची भाषा ऐकायला मिळाली. मी पुन्हा एकदा stun. बरे, मी स्टेजवर. समोर आमदार मोनिकाताई राजळे, पद्मश्री पोपटराव पवार, मसापच्या कार्यवाह सुनिताराजे पवार असल्याने माझ्यावर निर्बंध आलेले. तरी तेव्हाच मी पुटपुटलो, ‘मी ते परत करतो.’ कार्यक्रम आटोपतानाच मी शाखाध्यक्षांची व्यासपिठावरच भेट घेतली व उघडूनही न पाहिलेलं ते पाकीट त्यांच्याकडे जसंच्या तसं परत केलं. त्यांनीही ते आनंदानं स्विकारलं. त्या आनंदानं मात्र मराठी साहित्य परिषदेला पुरेपूर वस्त्रहीन म्हणजे नागवं केलं. दळभद्रीपणाची मानसिकता असेल तर यापेक्षा वेगळं काय आढळणार!
त्यावेळी त्या संयोजकांना मी म्हटलं, ‘मी आता निघतो.’ त्यांनी मस्तपैकी सांगितलं, की ‘तारकपूरला जा. तिथं तुम्हाला गाड्या मिळतील.’ आपल्या पाहुण्यांना असा निरोप दिला जातो का? साहित्यिकांना पुरस्कार दिले म्हणजे ते त्यांच्यावर केलेले उपकार होते का? हे गृहित धरून होणारं हडेलहप्पी वर्तन कोणत्या प्रकारचे म्हणायचे? याला गलथान कारभार तरी कसे म्हणायचे! पण, ज्यांच्या नावावर तुम्ही मिरवून घेता त्या साहित्यिकांचा असा अपमान करतात का? परत माझ्यापुढे प्रश्नच प्रश्न.
हॉलमधील रूम खाली केल्याने तात्पुरत्या स्वरूपात बॅग श्री. उदागे यांच्या दालनात ठेवलेली होती. ती उचलून मी बाहेर आलो. दुपार झालेली. त्यावेळी श्याम शिंदे यांना मी मोबाइल कॉल केला. कार्यक्रम आटोपून ते घरी निघाले होते. तेथून पुढे रात्री अकरा-साडेअकरापर्यंत एक मित्र म्हणून मी त्यांच्यासोबतच होतो. आम्ही तारकपूरसह नगरमधील एसटी स्टँडवर चौकशी केली. गाड्यांची वेळापत्रकं पाहिली व अंतिम कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच योग्य असल्याचं निदर्शनास आलं. शिवाय त्या गाडीचंच तिकिट काढावं लागलं. त्यातही नशिबानेच सीट मिळाली. रिक्षा, चहापाणी, जेवणाचा खर्च वेगळाच.
तीन-साडेतीन हजार रुपये खर्च करून मी अहमदनगरला आलो. शाखाध्यक्षांना कार्यक्रम उत्तम पार पडल्याचं समाधान मिळालं, वर्तमानपत्रे, सोशल मीडियावर बातम्या झळकल्या; पण आम्हा साहित्यिकांना मानसिक त्रासाशिवाय काय लाभलं? इतर साहित्यिकांनाही सुरुवातीला अशा रोख रकमेच्या पुरस्कारांची घोषणा झाली होती; पण पुढे त्याबाबत अवाक्षरही निघाले नाही. त्यांनाही ते देण्यात आले नाहीत. हा संयोजकांचा गुण कोणत्या सदरात मोडतो? असे स्वखर्चाने पुरस्कार घ्यायचे असतील तर त्यासाठी अहमदनगरमध्ये येण्याची आवश्यकताच काय होती! ते तर गावोगावी मिळाले असते. आमचे नगरचे साहित्यिक मित्र राजेश भालेराव हे याचं वर्णन करताना म्हणतात, ‘यजमानाने जेवणाचं निमंत्रण द्यायचं व येताना जेवणच घेऊनच या, असं सांगायचं. असंच हे झालं!’
कार्यक्रमस्थळी श्री. राजेंद्र उदागे यांनी कार्यक्रमासाठी हॉल, स्टेजवरचं डेकोरेशन, शिवाय नाष्टा-जेवणही मोफत दिल्याचं कळलं. उदागे यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. मग, शाखेनं काय केलं, हा प्रश्न पुरस्कारार्थींनी विचारणं तसं अयोग्यच. आमदार मोनिकाताई राजळे यांचीही कार्यक्रमस्थळी भेट झाली. त्यांनी हा कार्यक्रम स्पॉन्सर केल्याची चर्चाही कानावर पडली. मोनिकाताईंकडे पाहता एका शालीन व्यक्तिमत्त्वाला भेटल्याचा आनंद झाला. शिवाय कार्यक्रमावर खर्च करण्यासाठी बक्षिसांची रक्कम परत घेण्याइतपत राजळे कुटुंबीयांची आर्थिक स्थिती बिकट असावी असेही वाटले नाही. म्हणूनच असं काही घडत असेल तर स्व. राजळेंच्या नावे पुरस्कार देऊन त्यांना का बदनाम करता? कुठल्या तरी उपटसुंभ प्रवृत्तींच्या नादी लागून असं नाव बदनाम करून घेणं खचितच चांगलं नव्हे. भीक नको; पण कुत्रं आवर अशातलाच हा प्रकार आहे. साहित्य पुरस्काराचं निमित्त करून राजकारण्यांना बोलवून आपला स्वार्थ साधण्याचा हेतूच इथं महत्त्वाचा असल्याचेच दिसून आले.
मसापची भूमिका काय असावी…
पुरस्कार हा पुणेस्थित मसापच्या अहमदनगर शाखेचा. म्हणजे मसापचाच. असा प्रकार होणे हे मसापसाठी लांच्छनास्पदच. मसापला शासकीय मदतही मिळत असावी. तेव्हा अशा अपमानजनक उपक्रमाची त्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी व अगोदर घोषित केलेल्या व पुरस्कारांच्या लाटलेल्या रकमांसह येण्या-जाण्याचा खर्चही संबंधित पुरस्कारार्थींना द्यावा. तो मसापला डोईजड होईल असे वाटत नाही. शिवाय पुढे मसापचे नाव वापरणार्‍या संस्थांमधून पुरस्कारार्थींची राहण्याची नीट व्यवस्था व्हावी, अन् त्यांना मिळणारे पुरस्कारही(रकमेसह) देण्याचे सौजन्य दाखवण्यात यावे. असं घडत नसेल तर पुणे शाखेने अशा कार्यक्रमावरच बंदी टाकावी. शिवाय राजकारण्यांबरोबरच प्रकाशक, लेखकांविषयीही आस्था असणारे पदाधिकारी निवडण्यात यावेत. सरस्वतीची ही पालखी कोणत्याही अपप्रवृत्तींच्या हवाली करू नये. अर्थात अशांनी राजकारणी वा अन्य घटकांपुढे नतमस्तक व्हायचं ठरवलं, तरी तो शाखाबाह्य उपक्रम समजण्यात यावा.
मसापच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी या कार्यक्रमात झालेल्या त्यांच्या भाषणात औंधच्या महाराजांचं उदाहरण दिलं. त्यांनी कसा 999 वर्षांचा करार केला हे सांगितलं. ते उदाहरण समोर ठेवून मसापनं निदान पुरस्कारतरी नीट द्यावेत, याकडेही लक्ष द्यावे. सुनिताराजे यांनी पुढील काळात साहित्य जपायचे आणि पुढे न्यायचे असेल तर राजकारण, समाजकारण व साहित्य यांची सांगड अत्यंत गरजेची आहे, असंही सांगितलं असून ते वर्तमानपत्रांत छापूनही आलं आहे. तेव्हा त्यांनी साहित्य जपायचे असेल तर लेखकांचीही काळजी घ्यावी लागेल, असा संदेशही मसापमध्ये बिंबवणं आवश्यक आहे. नाहीतर मोकळ्या माळावर ओरड करायला गावच्या पाटलाचा हुकूम लागत नाही, यापेक्षा त्याची किंमत अधिक असणार नाही.
कोल्हापूरच्या दमसासारखी छोटी संस्थाही लेखकांना स्मृतिचिन्हासह येण्या-जाण्याचा खर्चही देते. कोराना होता तरी नगरच्याच पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार समितीने पुरस्कार मिळालेल्या लेखकांच्या घरी जाऊन तो प्रदान केला होता. श्याम शिंदे-राजेश भालेराव-बापू चंदनशिवे यांनी अहमदनगरमध्येच माझी मुलाखत ठेवलेली. त्यावेळी झालेला पाहुणचार हा लाजवाबच होता. पी. डी. पाटील, डी. वाय. पाटील यांच्या शिक्षणसंस्थांमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे मान-पान मसापला निश्चितच माहीत असावे. असो… साहित्याच्या प्रांगणात बुडवे, अप्पलपोटे टोळभैरव उभा करण्यापेक्षा चांगल्या लोकांच्या हातात अशा संस्था कशा राहतील हे पाहावे.
कवित्व मोठं आहे; पण थांबतो. एकूणच नगरच्या घडलेल्या प्रकारांमुळे अनंत यातना झाल्या. हे ऐतिहासिक उदाहरण महाराष्ट्रात सर्वदूर पसरले पाहिजे. कारण, लेखकांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेतही असं घडतं हे कळलंच पाहिजे. नाहीतर आमच्यासारखं तोंडावर आपटणं झाल्यानंतर शहाणपण येण्यात तसा अर्थ नाही.

Share This Article
Leave a comment