हरमल | प्रतिनिधी
विकसित तंत्रज्ञानामुळे मुलांचे वेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. आपली मुले या आभासी जगात वावरताना पालकांनी वेळीच सावध व्हायला हवे. सायबर गुन्हेगारी, फसवणूकीचे प्रमाण प्रचंड गतीने वाढत आहे. येणारी भावी पिढी त्यात अडकू नये यासाठी पालकांनी स्वतः डिजिटल साक्षर व्हावे. तंत्रज्ञानातील कौशल्ये व धोके समजून घेऊन सजगपणे आपली मुलं भारताची आदर्श नागरिक घडतील यासाठी प्रयत्नशील रहावे असे उदगार नामवंत लेखक, संपादक तथा वक्ते प्रभाकर ढगे यांनी केरी पेडणे येथे पालक सभेत मार्गदर्शन करताना काढले.
न्यू इंग्लिश हायस्कुल, केरीच्या वार्षिक पालक शिक्षक संघाच्या सभेत प्रमुख पाहुणे या नात्याने सायबर पालकत्व याविषयावर ढगे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष अमृत पेडणेकर, उपाध्यक्ष संजना तळकर, केरी तेरेखोल शिक्षण संस्थेचे खजिनदार मिलिंद तळकर, सभासद बाबुसो तळकर, देवेंद्र गाड, आल्फ्रेड रॉड्रीगीज, मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर व पालक शिक्षक संघाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सभेत पुढे बोलताना ढगे म्हणाले कि, मुलांच्या वयाला साजेसा पालकांचा व्यवहार हवा, त्यांची वैचारिक भूक समजून त्यांना गुणात्मक वेळ द्यावा. तसेच डिजिटल एजमध्ये मुलातील माणूसपण हरवू नये याचे गंभीर्याने भान ठेवत प्रत्येक पालकांनी जागृक सायबर पालकत्वाची जाणीव ठेवावी.
आजची पिढी मोबाईलशी जोडली गेल्याने तंत्रज्ञानासोबत जगणे अनिवार्य बनले आहे. मोबाईल नावाचं यंत्र दुधारी शस्त्र असून त्याचा किती संयम किंवा अतिरेकाने वापर करतो यावर सर्वांचे शहाणपण ठरते, असे ढगे म्हटले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय मुलांनी तू बुद्धी दे ही प्रार्थना सादर केली. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वल झाले. गुरुप्रसाद तांडेल यांनी व्हिडीओच्या माध्यमातून वार्षिक कार्यक्रमांचा अहवाल सादर केला. नंतर त्यांनीच वार्षिक जमा खर्च सादर केला. मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी आपल्या भाषणातून शाळेची दिशा स्पष्ट केली. सर्वेश कोरगावकर यांनी पाहुण्यांचा परिचय केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षिता नाईक व आल्फ्रेड रॉड्रीगीज यांनी केले. संजना तळकर हिने आभार मानले तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.