कर्जत/जामखेड | रिजवान शेख | २७.६.२०२४
काम पूर्ण झालेला कर्जतचा एसटी डेपो सुरु करण्यात यावा आणि कर्जत व जामखेड तालुक्यासाठी पुरेशा नवीन एसटी बसेस आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व एमडी माधव कुसेकर यांना दिले.
कर्जतच्या एसटी डेपोचा प्रश्न गेल्या २५ वर्षांपासून भिजत पडला होता. याच विषयावर यापूर्वी अनेक निवडणुका झाल्या आणि जिंकल्या गेल्या परंतु डेपोचा प्रश्न मात्र जैसे थे होता. हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. त्यानुसार आमदार होताच रोहित पवार यांनी पहिल्या तीन-चार महिन्यातच महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कर्जतच्या एसटी डेपोला मंजुरी आणली आणि सद्यस्थितीत या डेपोचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या दिड-दोन वर्षांपासून हे काम पूर्ण झाले असले तरी सरकार बदलल्यामुळे श्रेयवादामुळे हा डेपो सुरु केला जात नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन हा डेपो सुरु करण्याची मागणी केली होती. आज पुन्हा त्यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन देऊन हा डेपो तातडीने सुरु करण्याची आणि डेपोसाठी आवश्यक मनुष्यबळ व एसटी बसेस नव्याने उपलब्ध करुन देण्याबाबत एसटी महामंडळाचे जिल्हा नियंत्रक व आगार व्यवस्थापक यांनी सादर केलेला प्रस्ताव मंजूर करण्याची आग्रही मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.
जामखेड बस स्थानकासाठीही पुरेशा बस नाहीत. सध्या कार्यरत असलेल्या बसेस या जुन्या झाल्या असल्याने बिघाड होण्याचे प्रमाणही मोठे आहे. प्रवाशांची संख्या वाढत असताना पुरेशा बसअभावी त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक या सर्वांनाच अनेक अडचणींना समोरे जावे लागते. जामखेड बस स्थानकासाठी नवीन बसेसचा प्रस्तावही शासन स्तरावर प्रस्तावित करण्यात आला असून तोही मंजूर करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे.
दरम्यान, कर्जत एसटी आगार बांधकाम आणि व्यापारी संकुलाच्या वरच्या मजल्याच्या बांधकामास शासन स्तरावरून मान्यता मिळालेली असून हे बांधकाम सुरू आहे. मात्र या बांधकामासाठीची निविदा मूळ निविदा रकमेच्या दरापेक्षा कमी दराने प्राप्त झाल्याने काही रक्कम शिल्लक आहे. या रकमेतून कर्जत आगारा अंतर्गत बांधकाम होत असलेल्या व्यापारी संकुलाच्या वरच्या मजल्याचे बांधकाम झाल्यास या ठिकाणच्या व्यावसायिकांना व्यवसासाठी हक्काची जागा मिळणार आहे. शिवाय एसटी महामंडळालाही यातून उत्पन्न मिळेल आणि आगाराच्या अवतीभोवती होत असलेले अतिक्रमण थांबून वाहतूक व रहदारीचाही प्रश्न कायमचा सुटणार आहे. याबाबतही आमदार रोहित पवार यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि तसे पत्रही दिले.
कर्जतच्या एसटी डेपोबाबत निवडणुकीत दिलेला शब्द आमदार झाल्याबरोबर पहिल्या ३-४ महिन्यातच पूर्ण केला आणि आता हे काम शंभर टक्के पूर्ण झालंय. त्यामुळे एसटी डेपो सुरु करणं आवश्यक आहे. या डेपोसह जामखेडसाठीही तातडीने पुरेशा बस देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती आणि आता याचसंदर्भात एसटी महामंडळाचे एडी कुसेकर साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. याबाबतचे सर्व प्रस्ताव पूर्ण असल्याने ते लवकरच मंजूर करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. येत्या २१ जुलैपर्यंत कर्जतचा डेपो सुरु केला नाही आणि पुरेशा बसेस मिळाल्या नाहीत तर नागरिकांच्या सहकार्याने मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल, असे आ. रोहित पवार म्हणाले