नवी मुंबई | प्रदिप बडदे | २४.६.२०२४
महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या कविता डाॅट काॅम साहित्य चळवळीचा द्वितीय वर्धापनदिन येत्या रविवारी ता. ३० जून रोजी मराठी साहित्य मंदिर वाशी येथे चार वाजता साजरा होत आहे. दोन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राच्या वाड्या, वस्त्या तांड्यावर जात कुठलेही मानधन न घेता माय मराठीचा जागर करत प्रयोगाची पन्नाशी ओलांडली आहे. ही घोडदौड अविरतपणे सुरू आहे. आजपर्यंत कविता डॉट कॉमने यात्रा, जत्रा, अखंड हरिनाम सप्ताह, दशक्रिया विधी, हळदी समारंभ, सेवानिवृत्ती, जयंती, पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम साजरे करून नवकवींना मंच उपलब्ध करून दिला आहे. या परिवाराला दोन वर्षे पूर्ण होत आहेत.
द्वितीय वर्धापन दिनानिमित्त अध्यक्ष म्हणून कवी अरुण म्हात्रे, प्रमुख पाहुणे म्हणून लोककवी प्रशांत मोरे, उद्घाटक म्हणून कवी साहेबराव ठाणगे, सोबतच पूर्व अध्यक्ष कवी अशोक बागवे या दिग्गज मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
सोबतच महाराष्ट्रातील ताज्या दमाच्या निमंत्रित कवींच्या कवी संमेलनाचा आस्वाद घेता येणार आहे. कार्यक्रमाचं निवेदन महेंद्र कोंडेड करणार असून, सोबतच जेष्ठ रंगकर्मी रविंद्र औटी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष प्रा. रविंद्र पाटील आणि साहित्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, नवी मुंबईतील साहित्य प्रेमींनी सहभाग घ्यावा. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काव्यप्रेमी मंडळी मेहनत घेत आहेत.