वेस्ट इंडिज टी२० विश्वचषकातून बाहेर, दक्षिण आफ्रिका तीन गडी राखून विजयी, दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत - Rayat Samachar

वेस्ट इंडिज टी२० विश्वचषकातून बाहेर, दक्षिण आफ्रिका तीन गडी राखून विजयी, दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत

रयत समाचार वृत्तसेवा

मुंबई | गुरुदत्त वाकदेकर | २४.६.२०२४

टी.   २० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ फेरीतील गट-२ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना वेस्ट इंडिजशी झाला. अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर हा नॉकआउट सामना खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत ८ गडी गमावून १३५ धावा केल्या. तथापि, डकवर्थ-लुईस नियमानुसार, आफ्रिकेसमोर १७ षटकांत १२३ धावांचे लक्ष्य होते, ते त्यांनी १६.१ षटकांत सात गडी गमावून साध्य केले.

यजमान वेस्ट इंडिज टी२० विश्वचषकातून बाहेर पडली आहे. सुपर-८ सामन्यात दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमानुसार त्यांचा तीन विकेट राखून पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने २० षटकांत ८ गडी गमावून १३५ धावा केल्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या दोन षटकांनंतर २ बाद १५ धावा असताना पावसाने व्यत्यय आणला. सामना सुरू झाला तेव्हा तीन षटके कमी करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेला १७ षटकांत १२३ धावांचे लक्ष्य मिळाले. म्हणजेच त्यांना उर्वरित १५ षटकांत १०८ धावा करायच्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने १६.१ षटकांत ७ गडी गमावून लक्ष्य गाठले. मार्को यानसेनने १४ चेंडूत २१ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय ट्रिस्टन स्टब्सने २९ धावांची आणि हेनरिक क्लासेनने २२ धावांची खेळी खेळली.

या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याचवेळी यजमान वेस्ट इंडिज सुपर-८ फेरीतूनच बाहेर पडला. सुपर-८ च्या गट-२ मधून उपांत्य फेरी गाठणारे दोन संघ निश्चित झाले. दक्षिण आफ्रिका अव्वल, तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सामना सुपर-८ च्या गट-१ मधील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होईल, तर इंग्लंड संघाचा सामना गट-१ मध्ये अव्वल स्थानावर असलेल्या संघाशी होईल. उपांत्य फेरीचे सामने २७ जून रोजी होणार आहेत.

तबरेझ शम्सीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. आज रात्री ८ वाजता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तर उद्या सकाळी ६ वाजता सुपर-८ फेरीतील शेवटचा सामना अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळवला जाईल.

VIRAJ TRAVELS
Ad image
Share This Article
Leave a comment