एमएचटी- सीईटी परीक्षा पद्धती पारदर्शकच - आयुक्त दिलीप सरदेसाई; विद्यार्थी व पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन - Rayat Samachar

एमएचटी- सीईटी परीक्षा पद्धती पारदर्शकच – आयुक्त दिलीप सरदेसाई; विद्यार्थी व पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

रयत समाचार वृत्तसेवा
13 Min Read

मुंबई (प्रतिनिधी) २२.६.२०२४

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया संगणकाधारित आणि केंद्रीय पद्धतीने राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. हीच पद्धत नंतर केंद्र सरकारने स्वीकारली आहे. ही पद्धत पूर्णपणे पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेपरहीत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत केले.

मंत्रालयातील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात आज दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त सरदेसाई बोलत होते. यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक विनोद मोहितकर आदी उपस्थित होते.

आयुक्त सरदेसाई यांनी सांगितले की, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून МНТ-СЕТ 2024 परीक्षा घेण्यात आली. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अभियांत्रिकी औषधनिर्माणशास्त्र, कृषी शिक्षण या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली MHT-CET 2024 ही सामाईक प्रवेश परीक्षा २२ ते ३० एप्रिल 2024 (पीसीबी ग्रुप) आणि २ ते १६ मे २०२४ (पीसीएम ग्रुप) या कालावधीत एकूण १६९ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. पीसीबी ग्रुपची परीक्षा १२ सत्रांमध्ये, तर पीसीएम ग्रुपची परीक्षा १८ सत्रांमध्ये घेण्यात आलेली आहे.

या परीक्षेस एकूण ३ लाख ३० हजार ९८८ विद्यार्थी, ३ लाख ९४ हजार ३३ विद्यार्थिनी व ३१ ट्रान्सजेंडर उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली होती. या पैकी ६ लाख ७५ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उमेदवाराचे एखाद्या प्रश्नांचे उत्तर चुकीचे असल्यास त्या प्रश्नाला ऋण गुण (Negative Marks) देण्याची पद्धत नाही. सदर निकाल पर्सेंटाईल पद्धतीने घोषित करण्यात आलेला आहे. सदर परीक्षेच्या निकालामध्ये कोणत्याही उमेद‌वाराला अनुग्रह गुण (Grace Marks) देण्यात आलेले नाहीत. या परीक्षेअंतर्गत प्रश्न अथवा उत्तर याबाबत पालक, परीक्षार्थी यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील, तर सीईटी कक्षामार्फत ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. उमेद‌वारांनी नोंदविलेल्या आक्षेपांची विषय निहाय तज्ज्ञांकडून पडताळणी करुन घेण्यात आलेली आहे व त्या अनुषंगाने उत्तर तालिकेमध्ये (Answer Sheet) योग्य ते बदल करून याबाबतचा अह‌वाल उमेदवारांच्या माहितीकरीता सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदर सुधारित उत्तरतालिकेचा अंतर्भाव करून निकाल प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवाराला मिळालेल्या गुण निकाल प्रक्रियेच्या सूत्रानुसार आणि सत्रनिहाय निकाल पर्सेंटाईल स्वरुपात घोषित करण्यात आलेला आहे.

एकाच सत्रात समान गुण (Raw Score) मिळालेल्या उमेदवारांना समान पर्सेंटाइल मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे ही परीक्षा वेगवेगळ्या दिवशी प्रत्येकी दोन सत्रात घेण्यात आलेली आहे. त्यामुळे विविध सत्रांमधील समान गुण (Raw Score) मिळालेल्या उमेद‌वारांना वेगवेगळे पर्सेंटाईल मिळालेले आहेत. तसेच उमेदवारांना उपलब्ध केलेल्या उत्तरतालिकेप्रमाणे त्यांनी काढलेले गुण त्यांना मिळालेले नाहीत, हा सुद्धा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही. या कार्यालयामार्फत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंद‌णी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. उमेद‌वारांनी नोंदविलेल्या आक्षेपांची विषय निहाय तज्ज्ञांकडून पडताळणी करुन घेण्यात आलेली आहे व त्या अनुषंगाने उत्तर तालिकेमध्ये (Answer Sheet) योग्य ते बदल करून याबाबतचा अहवाल उमेदवारांच्या माहितीकरीता सीईटी कक्षाच्या cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदर सुधारित उत्तरतालिकेचा अंतर्भाव करुन निकाल प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवाराला मिळालेल्या गुण निकाल प्रक्रियेच्या सूत्रानुसार सत्रनिहाय निकाल पर्सेंटाईल स्वरुपात घोषित करण्यात आलेला आहे. सदर परीक्षा वेगवेगळ्या बॅचद्वारे घेवून त्याची एकच गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते. प्रत्येक बॅचला वेगवेगळी प्रश्नपत्रिका असते, असाही आक्षेप होता. तथापि, प्रत्येक सत्राचा निकाल स्वतंत्रपणे तयार करण्यात येतो. ही कार्यपद्धती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर आहे. एप्रिल २०२४ परीक्षेआधी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे हा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही. तसेच आतापर्यंत सीईटी सेल, मुंबई कार्यालयामध्ये निवेदन घेवून आलेल्या जवळपास २०० पालक/ उमेदवार तसेच ई- मेलद्वारे प्राप्त झालेल्या निवदेनांची शहानिशा करून प्रत्येक तक्रारीचे निराकरण करण्यात येत आहे. तसेच आक्षेप नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या रकमेपैकी जे आक्षेप ग्राह्य धरण्यात आले आहेत अशा ५४ जणांना त्यांनी जमा केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

यामध्ये सर्व सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी बॅचप्रमाणे पर्सेंटाईल पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येतो. ही परीक्षा पद्धत वर्ष २०१८-१९ पासून राबविण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांची उत्तरपत्रिका पाहण्याची संधी तांत्रिक बाबींच्या परिपूर्ततेनंतर २७ व २८ जून २०२४ रोजी सीईट सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे, असेही आयुक्त सरदेसाई यांनी सांगितले. यावेळी डॉ. देवळाणकर, मोहितकर यांनी ही या परीक्षा पद्धतीविषयी माहिती दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *