धर्मवार्ता
२०.६.२०२४
पोप यांना भेटल्यावर त्यांना अभिवादन, संबोधित कसे करतात ?
नुकतीच इटली येथे या शहरात जी-७ राष्ट्रांच्या प्रमुखांची परिषद झाली. भारत या राष्ट्र समूहाचा सभासद नाही तरी एक महत्त्वाचे राष्ट्र म्हणून भारताला एक निमंत्रित म्हणून या परिषदेत सहभागी होता आले. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत हजर होते. जी-७ बैठक इटलीत होती आणि साहजिकच रोम शहरात मद्यवर्ती ठिकाणी असलेल्या व्हॅटिकन सिटी या जगातल्या सर्वात चिमुकल्या राष्ट्राचे प्रमुख म्हणून पोप फ्रान्सिससुद्धा एक निमंत्रित म्हणून या दोन दिवसांच्या परिषदेला हजर होते.
देशातील राजकीय नेत्यांना संबोधित करण्याची पोप यांची अर्थातच पहिली वेळ नाही. पोप पॉल सहावे हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेला १९६५ साली संबोधित करणारे पहिले पोप.
हा, तर यावेळी या परिषदेच्या यजमान असलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी परिषदेला आलेल्या पोप फ्रान्सिस यांना ‘होली फादर’ असे संबोधित त्यांचे स्वागत केले, असे बातम्यांत म्हटले आहे.
इटलीचे मूळचे बहुतांश नागरिक कॅथोलिक कुटुंबात जन्मलेले असतात. उदाहरणार्थ, काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी. तर कॅथोलिक परंपरेत वाढल्या असल्याने इटलीच्या पंतप्रधान मेलोनो पोप फ्रान्सिस यांना `होली फादर’ म्हणूनच अभिवादन करणार यात आश्चर्य नाही.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही कॅथोलीक नसल्याने त्यांनी पोप फ्रान्सिस यांना `होली फादर’ म्हणून अभिवादन करण्याची गरज नव्हतीच.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेन हे रोमन कॅथोलीकआहेत. बिडेन श्रद्धावंत कॅथोलीक आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी भारतात आल्यावर त्या रविवारी त्यांच्यासाठी होली मास साजरा करण्यासाठी एक ख्रिस्ती धर्मगुरु अमेरीकन दुतावासातर्फे बोलावण्यात आला होता.
त्यामुळे अमेरीकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेन पोप यांना जेव्हाजेव्हा भेटतात तेव्हा ते त्यांना ‘होली फादर’ असेच संबोधित असतील, याविषयी शंका नसावी.
मागे २०१६साली येमेन येथे मिशनकाम करणाऱ्या मूळचे केरळचे असलेल्या टॉम युझून्नाळील या डॉन बॉस्को संस्थेच्या धर्मगुरुचे अपहरण झाले होते, त्यांना ओलीस म्हणून ठेवण्यात आले होते. सव्वा वर्षानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि व्हॅटिकन सिटीच्या मध्यस्थीने त्यांची सुटका झाली.
त्यानंतर फादर टॉम यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आभारही मानले होते.
भारतात येण्याआधी त्यांनी व्हॅटिकन सिटी मध्ये पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. या भारतीय ख्रिस्ती धर्मगुरुने आपल्या परमाचार्यांना कशाप्रकारे अभिवादन केले असेल, याची काही कल्पना करता येईल काय?
फादर टॉम यांनी पोप फ्रान्सिस यांना चक्क भारतीय परंपरेनुसार साष्टांग नमस्कार घालून अभिवादन केले होते.
जगभर पोप जातात तेव्हा त्यांना स्थानिक परंपरेनुसार अभिवादन केले जाते, साष्टांग नमस्कार करुन त्यांच्या विषयीचा आदर अशाप्रकारे बहुधा पहिल्यांदा केला गेला असेल.
पोप फ्रान्सिस यांना आलिंगन देऊन, त्यांची गळाभेट घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही नक्कीच एकमेव व्यक्ती असणार याविषयी शंकाच नाही.
ख्रिस्ती धर्मातील परमगुरुस्वामी आणि त्याशिवाय राष्ट्रप्रमुखही असलेल्या पोप यांच्याशी हस्तांदोलन कुणीही व्यक्ती – अगदी तळागाळातील सामान्य व्यक्ती, स्त्री अथवा पुरुष – करु शकतो हे विशेष आहे.
शिवाशिव आणि विटाळ वगैरे मुद्दाच नाही. लिंगभेद, वर्णभेद आणि वंशभेदसुद्धा नसतो.
पोप आणि इतर कॅथोलीक व्रतस्थ धर्मगुरु आणि नन्स आजन्म ब्रह्मचारी असतात, तरी ते भिन्नलिंगी व्यक्तीशी हस्तांदोलन करु शकतात. त्यामुळे त्यांचे ब्रह्मचर्य अजिबात खतरेमे येत नाही.
निदान याबाबतीत तरी ख्रिस्ती धर्म फार पुढारलेला आहे असे म्हणता येईल.
काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या स्वच्छ या संघटनेने काही कचरा गोळा करणाऱ्या सफाई कामगारांना रोममध्ये एका परिषदेसाठी नेले होते.
या सफाई कामगारांची जात काय असेल याविषयी तर्क करण्याची गरजच नाही.
तर त्यापैकी रिबेका या नावाच्या दापोडी झोपडपट्टीतील एका ख्रिस्ती महिलेने पोप फ्रान्सिस यांच्याशी हस्तांदोलन केले होते. `सकाळ टाइम्स’ या दैनिकात याबाबत माझी बातमी बायलाईनसह प्रसिद्ध झाली होती.
पोप जॉन पॉल हे संत मदर तेरेसा यांचा चेहरा आपल्या दोन्ही हातांत घेऊन त्यांचे कपाळावर अत्यंत मायेने चुंबन घेत असत.
इति पंतप्रधान मोदीजी आणि पोप फ्रान्सिस गळाभेट पुराण.
– कामिल पारखे,
पुणे, महाराष्ट्र