अहमदनगर (प्रतिनिधी) १५.६.२०२४
येथील प्रसिद्ध चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या कलेच्या सन्मानार्थ व्हीनस कंपनीने त्यांच्या नावाने नवीन ब्रश मालिका बाजारात विक्रीसाठी आणली आहे. आर्ट पुणे फाउंडेशन आणि व्हीनस ट्रेडर्स यांच्या तर्फे पुण्यात दरवर्षी व्हीनस कला महोत्सव भरविण्यात येतो. यामध्ये ब्रश मालिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जेष्ठ कलाशिक्षक डॉ. सुधाकर चव्हाण, अजित गाडगीळ, व्हीनस ट्रेडर्सचे संचालक सुरेंद्र करमचंदानी, रावसाहेब गुरव, सुभाष पवार, प्रियंवंदा आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमोद कांबळेज् मास्टरस्ट्रोक, आर्टिस्ट प्रमोद कांबळे गोल्डन ज्युबिली कलेक्शन ब्रश या नावाने हे ब्रश बाजारात आणण्यात आले आहे. भारतात एखाद्या कलाकाराच्या नावाने ब्रश मालिका कंपनीने काढणे हे प्रथमच घडले असावे, हे प्रमोद कांबळे यांच्या कष्टाचे चीज करणारी घटना आहे.
व्हीनस ट्रेडर्समध्ये कला विद्यालयाचे विद्यार्थी, एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षार्थी, हौशी आणि व्यावसायिक कलाकार जेव्हा चित्रकलेला लागणारे साहित्य खरेदीसाठी येतात तेव्हा ते आवर्जून प्रमोद कांबळे हे कोणत्या प्रकारचे ब्रश, रंग किंवा साहित्य वापरतात तेच साहित्य द्या म्हणून खरेदी करतात. त्यामुळे कंपनीने त्यांच्याच नावाने ब्रश मालिका विक्रीसाठी आणण्याची कल्पना सुचली.
प्रमोद कांबळे यांनी व्हीनस कंपनीने आपल्या नावाने ब्रश मालिका काढल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण या गोष्टीचा आनंद व्यक्त करतो. आपल्या कलेचा हा गौरव आहे. मातापिता, गुरु यांचे आशीर्वाद आणि पुण्याई आहे त्यामुळे हे घडले. नवोदित कलाकार आणि व्यावसायिक कलाकारांना यातून निश्चित झोकून देऊन काम करण्याची प्रेरणा मिळेल असे ते म्हणाले.