म.सा.प. च्या मध्यस्थीने सुरेश कंक यांचे उपोषण मागे - Rayat Samachar

म.सा.प. च्या मध्यस्थीने सुरेश कंक यांचे उपोषण मागे

रयत समाचार वृत्तसेवा

पिंपरी (प्रदीप गांधलीकर) १४.६.२०२४

पिंपळे गुरव येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्वतंत्र शाखा मंजूर करण्यात यावी या मागणीसाठी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक यांनी त्यांच्या निवासस्थानी दिनांक ११ जून २०२४ पासून भालेकरनगर, पिंपळे गुरव येथे अन्नत्याग उपोषणाचा प्रारंभ केला होता. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे यांनी शुक्रवार, दिनांक १४ जून २०२४ रोजी सुरेश कंक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी पत्र देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सुरेश कंक यांनी ज्येष्ठ साहित्यिक मधु जोशी यांच्या हस्ते नारळपाणी प्राशन करून उपोषण मागे घेतले.
. त्यावेळी पिंपरी चिंचवड परिसरातील ज्येष्ठ साहित्यिक मधु जोशी, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आजीव सदस्य संजय पवार, श्रीकांत चौगुले, जयश्री श्रीखंडे, श्रीकांत जोशी, कोमल पाटील उपस्थित होते.
मसाप पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी कंक यांना दिनांक ७ जून २०२४ च्या पत्राद्वारे नवीन शाखा देण्याचे धोरण नसल्याचे कळविले होते तसेच आगामी बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल असेही कळविले होते परंतु त्यास कंक यांनी प्रतिसाद न देता उपोषण सुरू केले.
याबाबत दिनांक १३ जून रोजी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी बैठकही घेण्यात आली.
जिल्हा प्रतिनिधी व पिंपरी – चिंचवडमधील साहित्यिक यांनी कंक यांच्या निवासस्थानी भेट देऊन राजन लाखे यांनी मसाप मुख्यालायाने लवकरात लवकर बैठक घ्यावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तसेच सदर शाखा मागणीचा प्रस्ताव मसाप पुणेच्या आगामी बैठकीत मांडण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे पत्र दिले व उपोषण ही टोकाची भूमिका अवलंब करण्यापेक्षा सामोपचाराने हा प्रश्न मार्गी लावावा तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
याप्रसंगी साहित्यिक प्रदीप गांधलीकर, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, सुभाष चटणे, तानाजी एकोंडे, सुभाष चव्हाण, मुरलीधर दळवी तसेच कंक कुटुंबीयांची उपस्थिती होती.

– प्रदीप गांधलीक

Share This Article
Leave a comment