बेलापूर यात्रेतील जंगी हगाम्याची 'खंडीत' परंपरा गावकऱ्यांनी नव्याने जोपासली - Rayat Samachar

बेलापूर यात्रेतील जंगी हगाम्याची ‘खंडीत’ परंपरा गावकऱ्यांनी नव्याने जोपासली

रयत समाचार वृत्तसेवा

श्रीरामपूर (प्रतिनिधी) ११.६.२४
छत्रपती शाहूमहाराज यांनी तरुण पिढीचे मन आणि मनगट निरोगी बनावे यासाठी महाबली हनुमानाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा करुन कोल्हापूरात पहिली तालीम सुरु केली. तीच प्रेरणा घेवून सुमारे १२५ वर्षापूर्वी स्व. भागवतराव खंडागळे, स्व. बाबूराव बंगाळ, दामोधर वाबळे या धुरंधरांनी वज्रदेही तालीम मंडळ नावाने तालीम बांधली. या तालमीचे वस्ताद पै. अगस्ती देसाई यांनी स्व. ज्ञानदेव गुलदगड, स्व. अशोक जगताप, स्व. वसंत कुंभकर्ण तानाजी जावरे यासारखे पैलवान मल्ल निर्माण केले.
आजही महाराष्ट्र कुस्ती शौकीनांत पै. हरिश्चंद्र बिरासदार, पै. दादा चौंगुले, पै. छबुभाऊ लांडगे यासारखे तर महाराष्ट्र कुस्ती चॅंपियन मल्ल पैलवानांसह महिला कुस्तीपटूही महाराष्ट्राला मिळालेली देणगीच म्हटले पाहिजे. गावाच्या यात्रेच्या निमित्ताने ग्रामीण भागात गावोगावी बेलापूरच्या धर्तीवर जंगी हगामे भरविले जावे, अशी अपेक्षा कुस्तीशौकीनांनी बोलून दाखविले.
बेलापूरच्या हगाम्याच्या कुस्त्यांच्या दंगलीत हरियानातील पैलवान मल्ल सोनल ठाकूर, राहुरीतील महिला कुस्तीपटू कु.गायत्री थोरात हीला महिलाजोड न मिळाल्यामुळे तीने मैदानात प्रवेश केल्यानंतर “आमची ताई, आमचा अभिमान.” असल्याचे सांगुन तीला रोख रुपये एक हजार देवून संयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला तर दोन जखमी मल्लांना तातडीने कदम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करुन घरी पाठविण्यात आले.
जंगी हगाम्यात महाराष्ट्र कुस्ती चॅपियन मल्ल नरेंद्र टकले, मल्ल सागर कोल्हे, नारायण हारदे, कृष्णा काळे, अक्षय वडितके, सुनिल गागुर्डे आदींसह सुमारे दीडशे मल्ल पैलवानांनी आपली कुस्ती कला दाखविण्यासाठी अंगातील घामातून मैदानात चिखल करुन दाखविली. शेवटची निकाली कुस्ती अनिल ब्राम्हणे व मल्ल धनवट यांच्यात झाली. हगामा संयोजकांकडून सोन्याचे बदाम पान रोख रक्कम देवून त्याचा सन्मान करण्यात आला. प्रशांत मुंडलिक मित्र मंडळ यांच्या वतीने हेमंत मुथा, मास्टर हुडे, राजाभाऊ काळे, सद्दाम आत्तार यांच्या वतीने चांदीची मुद्रा देण्यात आली. पंच म्हणून गौतमभाऊ उपाध्ये, रविंद्र वायकर, सुरेश वाघ, संतोष होन यांनी काम पाहीले.
हगाम्याची प्रथा बंद पडु नये म्हणून भाऊ डाकले, अरुण शिंदे, देवमन भगत प्रत्येकी रक्कम रूपये ५,०००/- तर सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विष्णुपंत डावरे यांनी २,१००/- रूपये गावकरी मंडळाकडे सुर्पुत केले. ग्रामस्थाकडून कुठलीही लोकवर्गणी न घेता कार्यकर्त्यांच्या निधीतून हगाम्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे जि.प. सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अभिषेक खंडागळे यांनी सांगितले.
गावकरी मंडळाचे नेते जि.प.सदस्य शरद नवले, कृषी उपन्न बाजार समितीचे अभिषेक खंडागळे, सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच रफिकभाई शेख, सुभाष अमोलिक, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब दाणी, पुरुषोत्तम भराटे, प्रफुल्ल डावरे, जालिंदर कुर्‍हे, भाऊसाहेब कुताळ, मंगेश कुर्‍हे, सचिन वाघ, विशाल आंबेकर, भाऊसाहेब अमोलिक, भैया शेख, नफिकभाई सय्यद, जाकिर शेख, किशोर खरोटे आदींसह गावकरी मंडळाच्या विशेष परिश्रमातून हगामा संपन्न झाला.

Share This Article
Leave a comment