मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोड बोगद्याची पाहणी; मरीन ड्राईव्ह ते हाजी अली उत्तरवाहिनी खुली - Rayat Samachar

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोड बोगद्याची पाहणी; मरीन ड्राईव्ह ते हाजी अली उत्तरवाहिनी खुली

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read

मुंबई (गुरूदत्त वाकदेकर) १०.६.२४
‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गा’वरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हाजी अली परिसरापर्यंत उत्तर वाहिनी आजपासून खुली करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बोगद्याची पाहणी केली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.

उत्तर वाहिनी मार्गिका खुला केल्यामुळे शहरातील वाहतूक अधिक वेगवान होणार असून सुमारे पाऊण तासांचे हे अंतर अवघ्या १० मिनिटात कापता येणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. भुलाभाई देसाई मार्ग, बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली चौक) पर्यंत जाणे सुलभ होणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या सागरी किनारा मार्गाचा पहिला ९ किलोमीटरचा टप्पा खुला केला होता. आजपासून सव्वा सहा किलोमीटरचा दुसरा टप्पा खुला झाला आहे. सागरी किनारा मार्गाचा नरिमन पॉईंट येथून वरळीपर्यंत जाण्याऱ्या मार्गाची पाहणी केली. नरिमन पॉईंट ते हाजीअलीपर्यंतच्या सव्वा सहा किलोमीटर लांबीचा हा बोगदा आजपासून सुरू करण्यात आला आहे. जुलै महिन्यापर्यंत नरिमन पॉईंट ते वरळी हा सागरी मार्गाचा तिसरा टप्पाही सुरू होईल.

हा बोगदा अत्यंत अद्ययावत पध्दतीने बांधण्यात आला असून अत्यावश्यक परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्यासाठी टेलिफोन देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्वतः या फोनवरुन नियंत्रण कक्षाशी आपत्कालीन परिस्थितीत कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो त्याची माहिती जाणून घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विंटेज कारमधून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रवास करीत बोगद्याची पाहणी केली.

 

Share This Article
Leave a comment