मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) १०.६.२४
वाढत्या तापमानामुळे सर्व जीव त्रस्त झाले आहेत. पण ह्या परिस्थितीला मानवच अधिक प्रमाणात जबाबदार आहे. जे पेरले तेच उगवते, हा निसर्ग नियम आहे. मानवाच्या बेजबाबदारपणामुळेच आज ही परिस्थिती उद्भवली आहे आणि त्यामुळेच आपल्याला जागतिक पर्यावरण दिन साजरा करावा लागत आहे. साहित्याच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्याची संधी सारस्वतांना लाभली आहे.
उत्साह, नेतृत्वाचा आणि मूल्यांचा आदर्श जे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर देतात ते वडील. आपल्या सर्व कठीण क्षणांमध्ये आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहातात. जीवनात कोणत्याही समस्या आल्या तरी हार न मानता जीवन सकारात्मक, संघर्षात्मक आणि प्रेरणादायी जगण्यासाठी सदैव प्रेरित करत असतात, ते एक अद्भुत व्यक्तिमत्व म्हणजे वडील. त्यांनाच मानवंदनाच देण्यासाठी जागतिक पितृदिनाचे औचित्य साधून मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
“मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने चतुर्थ कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी शोध आनंदाचा फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सुखदरे आणि मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर हेदेखील उपस्थित होते.
कविसंमेलनामध्ये सरोज सुरेश गाजरे, रविंद्र शंकर पाटील, प्रणाली प्रकाश सावंत, महेंद्र रामचंद्र पाटील, छाया धर्मदत्त पाटील, प्रसाद यशवंत कोचरेकर, विक्रांत मारूती लाळे, जयश्री हेमचंद्र चुरी, नंदा कोकाटे, रामकृष्ण चिंतामण कामत, वैभवी विनीत गावडे, किशोरी शंकर पाटील, आदित्य प्रदीप भडवलकर, गोविंद शिवराम कुलकर्णी, सीमा विश्वास मळेकर, शैलेश भागोजी निवाते, गौरी यशवंत पंडित, बालकवी वेदान्त यशवंत पंडित, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, सविता नारायण काळे आणि प्रदीप महादेव कासुर्डे यांनी पहिल्या सत्रामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. मध्यंतरामध्ये शितलादेवी कुळकर्णी यांनी एक प्रहसन सादर करून उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. चहा अल्पोपहाराचा आस्वाद घेतल्यानंतर सगळेच कवी पुन्हा कविता सादरीकरणासाठी सज्ज झाले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सर्व कवींनी आपल्या लेखणीतून साकारलेल्या वडीलांबद्दलच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. कविता सादर होत असताना अनेकांना अश्रू अनावर झाले. कित्येकदा सभागृह नि:शब्द झाले.
कार्यक्रमाची सांगता करताना ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
जुलै महिन्याच्या पहिल्या रविवारी पुढचे मासिक कविसंमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षपदी अष्टपैलू साहित्यिक कल्पना मापूसकर असणार आहेत. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.
कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी जयश्री चुरी, नितीन सुखदरे, शैलेश निवाते, विक्रांत लाळे आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.