नाशिक | १६ जानेवारी | प्रतिनिधी
(literature) येथील पंचवटीमधील भावबंधन मंगल कार्यालयातील ‘स्व. देवकिसनजी सारडा साहित्य नगरीत’ ता.१० व ११ जानेवारी रोजी गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने दोन दिवसीय तिसरे ‘अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन मोठ्या जल्लोषात पार पडले. हुतात्मा स्मारक येथे संमेलनाध्यक्षा प्रा. डॉ. सुमती पवार, उद्घाटक ॲड. नितीन ठाकरे, माजी अध्यक्ष नानासाहेब बोरस्ते यांच्या हस्ते ग्रंथपूजन झाले.
(literature) यावेळी वाजत गाजत ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यामध्ये हलगीच्या तालावर अनेक साहित्यिक मंडळी नाचली आणि दिंडी भावबंधन मंगल कार्यालयामध्ये आली. सुरुवातीला श्री गणेश पूजन करण्यात आले. उद्घाटनाचा कार्यक्रम रघुवीर खेडकर तमाशासम्राट यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक ‘डॉ.शंकर बोऱ्हाडे पुरस्कार’ तमाशासम्राट रघुवीर खेडकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रेरणा फौंडेशन महिला मंडळाने मंगळागौर सादर केली. प्रयास फौंडेशनच्या दिव्यांग मुलामुलींनी विविध पारंपरिक गाणी सादर केली. दुपारी १२ वाजता उद्घाटक रघुवीर खेडकर यांच्या हस्ते शेकोटी प्रज्वलित करून पूजन करण्यात आले.
(literature) यावेळी संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कवयित्री प्रा.डॉ. सुमती पवार, स्वागताध्यक्ष नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, शिवकन्या बढे, लावणीसम्राज्ञी माधुरी पवार, तमाशा महोत्सव अध्यक्ष वसंतराव जगताप, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, कार्याध्यक्ष रविंद्र मालुंजकर आणि अनेक कवी, साहित्यिक आणि कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी लावणी स्पर्धा संपन्न झाली. या लावणी स्पर्धेत अनेक लावण्यवतींनी सहभाग घेतला. “जाऊ कवितेच्या गावा ” हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामध्ये शेकोटी कवी संमेलन प्रा. लक्ष्मण महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी अहिराणी कवी संमेलन, बालकवी संमेलन, गझल संमेलन, परिसंवाद, निमंत्रितांचे कवी संमेलन, नाशिक जिल्ह्यातील लोक कलावंतांचा कृतज्ञता सोहळा, महिला परिसंवाद, निळूभाऊ फुले वाड़मय पुरस्कार, स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार आणि इतर साहित्यिक पुरस्कारांचे वितरण झाले. दोन दिवस चाललेल्या ‘मनोरंजनातून प्रबोधन’ करणाऱ्या कार्यक्रमाची सांगता झाली.
हे ही वाचा : History: बळीराजा : भारतीय संस्कृतीचे प्रतीकस्वरूप – संजय सोनवणी