अकोले | रयत समाचार
(Agriculture) तालुक्यातील सुगाव येथे एका तरुण शेतकऱ्याची तीस लिटर दूध देणारी दुभती गाय वेळेवर पशुवैद्यकीय उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर आर्थिक आणि मानसिक आघात झाला असून प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
(Agriculture) माहितीनुसार, संबंधित शेतकऱ्याची गाय रात्रभर तडफडत होती. ती सतत हंबरत होती आणि अस्वस्थ अवस्थेत अंगावर धावत होती. नेमका कोणता आजार झाला आहे, हे कुटुंबाला समजू शकले नाही. प्राथमिक स्तरावर गायीला रेबीजची लागण झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
(Agriculture) घाबरलेल्या अवस्थेत संबंधित शेतकरी मदतीसाठी विविध व्हॉट्सअप ग्रुपवर संपर्क साधत होता. मात्र शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. मोबाईल फोन लागत असूनही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अखेर पत्रकार सुधीर लंके यांच्या प्रयत्नातून मदत मिळाली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. गाय तडफडून मृत्यूमुखी पडली.
या घटनेत शेतकरी कुटुंबाचे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. आधीच शेती, कर्जबाजारीपणा, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि बाजारपेठेतील अस्थिरता यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना किमान आपत्कालीन शासकीय सेवा तत्परतेने मिळायला हव्यात, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
दरम्यान, अकोले तालुक्यातील इतर शासकीय यंत्रणांबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमध्येही फोन उचलले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पूर्वी प्रत्येक कार्यालयात लँडलाईन फोन असायचे. अधिकारी उपलब्ध असायचे. आता मोबाईलचे युग आले, पण व्यवस्था नागरिकांपासून अधिक दूर गेली आहे. अडचणीच्या वेळी नागरिकांनी संपर्क साधायचा तरी कुणाशी? असा सवाल भाऊ चासकर यांनी उपस्थित केला.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आणि ग्रामीण भागातील आपत्कालीन पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
