Culture | राहुरी नगरची लालमातीची कुस्ती परंपरा; बी.डी.शेलार यांची ‘संस्कृतीवार्ता’ वाचा

राजर्षी शाहूंचा वसा वारसा

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

रयत समाचार 

संस्कृतीवार्ता | २३.५ | बी.डी. शेलार

(Culture) राजर्षी शाहूंचा वसा वारसा जगाला सांगणारा, महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा, दमदार आणि अस्सल मराठमोळा खेळ म्हणजे लाल मातीतील कुस्ती. घाम, माती, ताकद, चपळता, जिद्द आणि इमानदारी यांचा संगम म्हणजे आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक लाल मातीवरील कुस्ती. जागतिक कुस्ती दिनानिमित्त सर्व वस्ताद, पैलवान, कुस्तीगीर आणि कुस्ती शौकिनांना मनःपूर्वक शुभेच्छा.

(Culture) नगर जिल्ह्याला कुस्तीचा अतिशय समृद्ध आणि अभिमानास्पद वारसा लाभलेला आहे. राहुरीचे महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, नगर शहरातील उपमहाराष्ट्र केसरी छबुराव रानबोके आणि राहुरीतील उपमहाराष्ट्र केसरी आत्तार यांसारख्या दमदार मल्लांनी नगर जिल्ह्याची कुस्ती परंपरा संपूर्ण महाराष्ट्रात गाजवली. विशेषतः दक्षिण नगर जिल्ह्यात कुस्ती हा फक्त खेळ नसून तो संस्कार, परंपरा आणि अस्मितेचा विषय.

(Culture) नगर शहर परिसरात छबुराव रानबोके यांनी अनेक तालमी उभ्या करून असंख्य मल्ल घडविले. त्यांच्या तालमीतून तयार झालेल्या अनेक पैलवानांनी जिल्हाभर कुस्तीचा झेंडा उंचावला. त्याचप्रमाणे राहुरीतील उपमहाराष्ट्र केसरी आत्तार यांच्या दमदार आणि चुरशीच्या कुस्त्याही त्याकाळात विशेष गाजत असत.
‘मुलगा इंजिनिअर झाला नाही तरी चालेल, पण कोल्हापूरच्या तालमीत जाऊन पैलवान होऊन आला पाहिजे.’ ही भावना अनेक घरात आजही जिवंत आहे. म्हणूनच गावागावच्या फ्लेक्स बोर्डांवर अनेक युवा नेत्यांच्या नावापुढे ‘पैलवान’ हा शब्द अभिमानाने झळकताना दिसतो. सन १९८६ मध्ये महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारे राहुरीचे पैलवान गुलाब बर्डे हे त्या काळातील तरुणांच्या गळ्यातील ताईत होते. त्यांच्या अंगातील अफाट ताकद, विजेच्या वेगाची चपळता आणि आक्रमक डावपेच पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक यात्राजत्रांमध्ये गर्दी करत. आम्ही सातवी-आठवीत असताना गावोगावच्या यात्रांमध्ये फक्त गुलाब बर्डे यांची कुस्ती पाहण्यासाठी मैलोनमैल फिरत असू.
महाराष्ट्र केसरी हा किताब मिळाल्यानंतर गुलाब बर्डे यांच्याविषयी कुस्ती क्षेत्रात प्रचंड आदर आणि दरारा निर्माण झाला. त्यांच्या तोडीचा कुस्तीगीर मिळणे कठीण झाले होते. नगर जिल्ह्यातील उपमहाराष्ट्र केसरी दर्जाचे अनेक मल्लही त्यांच्या सन्मानापोटी किंवा त्यांच्या ताकदीसमोर कुस्ती करण्यास पुढे येत नसत. त्यामुळे अनेक जत्रांमध्ये गुलाब बर्डे यांना ‘बाय’ मिळत असे. पण तरीही ते लंगोट बांधून मैदानात उतरायचे. आपले पिळदार शरीरसौष्ठव दाखवत एक अप्रतिम ‘उलटी बजरंग उडी’ मारून सर्व प्रेक्षकांना अभिवादन करायचे आणि मग संपूर्ण मैदान टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून जायचे. “गुलाब बर्डे… गुलाब बर्डे…!” चा जयघोष आसमंत भरून टाकायचा. तो क्षण आजही डोळ्यांसमोर ताजा आहे.
त्यानंतर १९८८ मध्ये इंदूर येथे हिंदकेसरी कर्तारसिंग आणि गुलाब बर्डे यांच्यात झालेली ऐतिहासिक कुस्ती आजही भारतातील सर्वोत्तम झुंजींपैकी एक मानली जाते. आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते, प्रचंड ताकदीचे कर्तारसिंग यांना गुलाब बर्डे यांनी दिलेली चिवट आणि झुंजार लढत आजही कुस्तीप्रेमी विसरू शकत नाहीत. त्या कुस्तीने महाराष्ट्राच्या मातीतील पैलवानांची ताकद संपूर्ण देशाला दाखवून दिली. अशी ही राहुरी नगरची कुस्ती परंपरा.
आजही गुलाब बर्डे यांच्या चपळता, ताकद आणि आक्रमक खेळाचा वारसा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे सध्याचे हिंदकेसरी तथा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्यासारखे नवे दमदार मल्ल पुढे नेत आहेत. नव्या पिढीतही महाराष्ट्राची कुस्ती परंपरा तितक्याच जोमाने, ताकदीने आणि दिमाखाने पुढे जात आहे.

लेखक संपर्क – 9766909222 (लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ शाळा येथे शिक्षक आहेत)

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading