पुणे | ३० सप्टेंबर | प्रतिनिधी
Cultural Politics विज्ञान अध्यात्म आणि तत्वज्ञान जागतिक परिषदेचे औचित्य साधून संबंध वारकरी संप्रदायाचा ध्यास आणि श्वास असणाऱ्या अध्वर्य, घराण्यातील सत्पुरुष म्हणून एम.आय.टी. विश्वशांती विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र औसाचे पाचवे पिठाधिपती सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांना ‘समर्पित जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. ता. ३ ऑक्टोंबर रोजी जागतिक परिषद सोहळ्यात पुणे येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार. यासंबंधीची घोषणा व तसे निमंत्रण गुरुबाबा महाराज औसेकर यांना मिळाले असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष व श्री संत जगत्गुरु तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळा वर्ष पर्वात विज्ञान अध्यात्म आणि तत्वज्ञानाची सांगड असलेल्या जागतिक परिषदेच्या औचित्याने माईर्स एम.आय.टी.विश्वशांती केंद्र पुणे यांना वारकरी संप्रदायातील जुन्या परंपरेतील थोर, जाणकार, मानव कल्याणाचे कार्य करणाऱ्या, पावन घराण्यातील थोर निष्ठावंत अश्या धर्मप्रसारक सत्पुरुषांचा ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येत आहे.
ज्या विभूतींनी, घराण्याची, परंपरेची सेवा केली. संप्रदायाची वैष्णव परंपरा अगदी लहान वयापासून समर्थपणे सांभाळून अद्वैत भक्तीचे तत्व-भजन चक्रीभजन, किर्तने, प्रवचनाच्या माध्यमातून, महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणासह संपुर्ण भारत व पाश्चात्य देशात जावून रुजवली. लोकोध्दारक कार्य केले अशा नाथसंस्थानच्या सद्गुरु श्री. गुरुबाबा महाराज यांना ता.३ ऑक्टोबर घटस्थापनेदिनी खास सोहळ्यात विश्वराजबाग लोणी-काळभोर येथे सायंकाळी ६.०० वा. प्रदान करण्यात येत आहे.
पुरस्कार जाहीर होताच नाथ संस्थानच्या हजारो शिष्य भक्तांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा