समाजसंवाद | १७ ऑगस्ट | ललिता सरोदे-केदारे
आज आपल्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७८ व्या मंगलमयदिन साजरा करताना स्त्री आणि स्वातंत्र्य या मुद्द्याकडे दृष्टी टाकता. आपणांस स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील women स्त्रीजीवन, त्यांनी केलेला त्याग, संघर्ष विचारात घ्यायला हवा. भारतीय स्वातंत्र्याच्या सहभागीतेपासून ते आजच्या विकसनशील भारत घडविण्याच्या कार्यात महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. निसर्ग जसा सर्जनशील आहे. अगदी तशीच घर, कुटूंब आणि समाज घडविण्याची ईश्वरी देणगी म्हणजे स्त्री. जी फक्त चूल आणि मूलंच हे कर्तव्य पार पाडून समाजात विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवत आहे. डॉक्टर, वकील, बॅंकिंग, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, खेळ, वैज्ञानिक अशा अनेक क्षेत्रात महिला उत्तमरीतीने कार्यरत आहेत.
परंतु स्त्री आणि स्वातंत्र्य आज पुन्हा एकदा चर्चेत येणारा विषय. खरंच स्त्रीला स्वातंत्र्य मिळाले? की स्त्रीस्वातंत्र्याच्या कोणीही उठावं आणि गोष्टी कराव्यात. ‘लेडीज फर्स्ट’ तर सगळ्याच्या तोंडपाठ झालेली संकल्पना आहे आणि ती बरोबरही म्हणावी लागेल. कारण मन सावरण्यापासून समाज सावरण्यासाठी ती सगळ्यात पहिली असते. भावनिक, शारिरीक, मानसिक आघात सहज पेलावत असते. एवढेच काय तीच्यावर होणारे तिरकस विनोदही हसत मान्य करते
समाजात वावरत असतांना आपण पाहतो की स्त्री राष्ट्रपती, प्रधानमंत्री, संसदीय अध्यक्ष आदी पदे भुषविली आहेत तर काही ठिकाणच्या महिलांना अत्यंत लक्षणीय संकटांना सामोरे जावे लागत आहे. हा विरोधाभास आपल्या समाजात दिसून येतो.
ग्रामीण, आदिवासी भागात महिलांची अत्यंत हालाखीची परिस्थिती आहे. त्यांना स्वातंत्र्य काय ? याचा अर्थच माहिती नाही. शहर आणि ग्रामीण भाग या दोन्ही ठिकाणी प्रश्न एकच आहे ‘स्त्री स्वातंत्र्य’ परंतु त्यांचे स्वरूप भिन्नता वेगवेगळी आहे.
शैक्षणिक आणि सामाजिक, आर्थिकस्तर उंचावला म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य प्राप्त झाले असे म्हणता येणार नाही. पुरुषी मानसिकतेतुन तिची सुटका होणे म्हणजे खरे स्त्रीस्वातंत्र्य म्हणावे लागेल. अजुनही स्त्रीच्या मताला, निर्णयाला महत्व दिले जात नाही. बऱ्याच वेळा तर आसपास ऐकायला भेटते ‘स्त्रीची अक्कल चुलीपुढे’ म्हणजेच अजुनही स्वातंत्र्याच्या बाबतीत तिचा संघर्ष संपलेला नाही. हे स्त्री स्वातंत्र्याचा टेंभे मिरवणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे. बऱ्याच वेळा पुरुषी मानसिकता स्त्रीस्वातंत्र्याला ‘स्त्री स्वैराचार’ म्हणुन लेबल लावून टाकतात परंतु त्यांना हे समजायला हवे की, आतापर्यंत स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण जो स्वैराचार (मनमानी) करत आलो आहोत, ती स्त्रीने सहज स्वीकारली आहे आणि याच सहज स्वीकारण्याच्या स्वभावामुळे आजही महिला पुढे येण्यास धजावत नाही. मग ते शिक्षण असो किंवा आरोग्य याबाबत निष्काळजी बनल्या आहेत.
विविध योजनेच्या आधारे त्यांना दिल्या जाणाऱ्या सेवासुविधाही त्यांच्यापर्यंत योग्य रितीने पोहचत नाहीत. शैक्षाणिक सुविधा, आरोग्य सुविधा यांची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली, गरोदर माता, आणि बाळंत माता यांचे कुपोषण होऊन कुपोषित बालके जन्माला येणे ही धोक्याची घंटा आहे. विकसनशिल देशाच्या विकासाला ते गालबोट लागणे आहे.
भारतीय स्वातंत्र्याचे गोडवे गाताना समाजात होणाऱ्या स्त्री हिंसाचाराकडे दुर्लक्ष करणे हे भ्याड समाजाचे लक्षण आहे. कौटुंबिक हिंसाचाराची ही सुरूवात सामाजिक हिंसाचारापर्यंत आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक हिंसाचाराच्या घटना आहेत. त्यावर आपल्याकडे एकच पर्याय असतो, तो म्हणजे अंधारात कॅन्डल घेऊन फिरणे. या व्यतिरिक्त आपण काय केले पाहिजे हा विचार समाजाने करायला हवा. सध्या आपण पाहतो की, स्त्रीवर आत्याचार झाला हे एवढे कारण समाजाला पुरेसे नसते तर ती कोणत्या जातीतील, कोणत्या धर्मातील आहे मग त्या त्या जातीने धर्माने रस्त्यावर उतरणे ही कोणती मानसिकता समाजात रुचत आहे? आपल्या महापुरुषांनी स्वातंत्र्यसैनिकांनी कोणा एका जातीधर्मासाठी बलिदान दिलेले नाही, तर समस्त मानवजातीसाठी संघर्ष त्याग आणि बलिदान केले आहे.
सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी त्याकाळी अंगावर शेण, चिखल, झेलले होते. आताही तशी परिस्थिती आपण पाहतो. फक्त त्याचे स्वरूप वेगळे झाले, जसे की आपल्या देशासाठी ऑलम्पिक स्पर्धेत खेळणारी विनेश फोगट आणि तिच्या सहकारी यांच्यावर ओढवलेला प्रसंग संपुर्ण देशांनी पाहिला आणि वाचला आहे. एकविसाव्या शतकातही स्त्रीचा संघर्ष संपलेला नाही, ही खेदाची गोष्ट आहे.
स्त्रीस्वातंत्र्यता ही फक्त विचारांतुन नव्हे तर कृतीमधुन निर्माण व्हायला हवी. आजची स्त्री सुशिक्षित, झाली परंतु सुरक्षित कालही नव्हती आणि आजही नाही. स्त्री स्वातंत्र्याचे हे तोरण फक्त समाजाने घरोघरी लावून आनंद उत्सव केला पाहिजे.
कृपया, लेख वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.