मुंबई | ८ ऑगस्ट | गुरुदत्त वाकदेकर
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय cricket सामन्यात भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी कायम राहिली आणि या सामन्यात संघाला ११० धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ५० षटकांत ७ गडी गमावून २४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात संपूर्ण भारतीय संघ २६.१ षटकांत १३८ धावांत सर्वबाद झाला. भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा श्रीलंकेच्या फिरकीपटूंसमोर हतबल दिसली. श्रीलंकेसाठी फिरकीपटू ड्युनिथ वेलालगेने चमकदार कामगिरी करत पाच विकेट घेत भारतीय डाव खिळखिळा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारताविरुद्धची t20 मालिका ०-३ ने गमावल्यानंतर, श्रीलंकेने वनडे फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली. उभय संघांमध्ये पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत सुटल्यानंतर गोलंदाजांच्या जोरावर श्रीलंकेने पुढचे दोन्ही सामने जिंकले. अशाप्रकारे भारताकडून ही मालिका २-० ने जिंकण्यात श्रीलंकेला यश आले. चारिथ असलंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघासाठीही हा विजय महत्त्वाचा आहे कारण यजमान संघाने १९९७ नंतर प्रथमच भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली आहे. अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने १९९७ मध्ये भारताचा शेवटचा ३-० असा पराभव केला होता. तेव्हापासून भारताने सलग ११ वेळा एकदिवसीय मालिका जिंकली होती, परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ हा विक्रम कायम राखू शकला नाही आणि २७ वर्षांनंतर त्यांना श्रीलंकेकडून एकदिवसीय मालिका गमवावी लागली.
लक्ष्याचा पाठलाग करताना असिथा फर्नांडोने शुभमन गिलला बाद करत भारतीय संघाला पहिला धक्का दिला. ३७ धावांवर भारताने पहिला विकेट गमावला. गेल्या दोन सामन्यात अर्धशतके झळकावणारा रोहित शर्मा या सामन्यातही चांगली कामगिरी करेल असे वाटत होते, मात्र वेलालगेने कर्णधाराला बाद करून भारताला मोठा धक्का दिला. यानंतर भारताचा डाव गडगडला आणि भारतीय फलंदाज एकामागून एक विकेट गमावत राहिले. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे या सामन्यातही विराट कोहली प्रभाव पाडू शकला नाही आणि २० धावांवर तंबूमध्ये परतला. भारताची फलंदाजी इतकी खराब झाली होती की १०० धावांवर ७ विकेट गमावल्या. शेवटी वॉशिंग्टन सुंदरने २५ चेंडूत ३० धावांची खेळी केली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. भारतासाठी फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. विशेष म्हणजे भारताने फिरकीपटूंविरुद्ध नऊ विकेट गमावल्या.
संपूर्ण एकदिवसीय मालिकेत भारतीय फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करताना दिसले. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने फिरकीपटूंविरुद्ध एकूण २७ विकेट गमावल्या, जी इतक्या सामन्यांच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत फिरकीपटूंविरुद्ध कोणत्याही संघाने गमावलेल्या विकेटची सर्वाधिक संख्या आहे. त्याचवेळी, भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात एकापेक्षा जास्त वेळा पाच बळी घेणारा वेलालगे हा पहिला फिरकी गोलंदाज ठरला. भारताविरुद्ध त्याने दोनदा ही कामगिरी केली आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली आणि पथुम निसांका आणि अविष्का फर्नांडो यांनी पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. मात्र, पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे फिरकीपटूंना खेळपट्टीकडून मदत मिळत नव्हती. फर्नांडोने सुरुवातीपासूनच आक्रमक वृत्ती स्वीकारली. निसांकानेही डावखुरा फिरकीपटू अक्षर याच्या गोलंदाजीवर स्लॉग स्वीपसह दोन षटकार ठोकले. निसांकाने त्याचा चेंडू ऑफ साइडच्या बाहेर यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या हातात देऊन अक्षरने भारताला पहिले यश मिळवून दिले. निसांका ४५ धावा करून बाद झाला.
फर्नांडो आणि कुसल मेंडिस यांनी भारतीय गोलंदाजांविरुद्ध सहज धावा करून श्रीलंकेला मजबूत स्थितीत आणले. दिशाहीन गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद सिराजविरुद्ध फर्नांडोने सहज धावा केल्या. फर्नांडोने पुल शॉटने सिराजवर सलग दोन षटकार ठोकले. फर्नांडो मात्र परागच्या सरळ चेंडूवर पायचीत झाला आणि त्याचे चौथे एकदिवसीय शतक हुकले. फर्नांडोने १०२ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ९६ धावांची खेळी केली.
३६व्या षटकात श्रीलंकेची धावसंख्या दोन गडी बाद १७१ धावा होती आणि यजमान संघ २८० धावांच्या जवळ जाईल असे वाटत होते. त्यानंतर परागने कर्णधार चारिथ असलंकाला (१०) पायचीत केले आणि त्यानंतर दुनिथ वेललागे (२) याला तंबूमध्ये पाठवून श्रीलंकेची लय भंगली. वेगवान फिरणाऱ्या चेंडूवर परागने वेललागेचा त्रिफळा उध्वस्त केला. सिराजने सदिरा समरविक्रमाला तर वॉशिंग्टन सुंदरने जेनिथ लियानागेला बाद केल्याने श्रीलंकेची धावसंख्या सहा विकेट्सवर १९९ धावांपर्यंत पोहोचली. त्यामुळे यजमान संघाने २८ धावांत ५ गडी गमावले. मात्र, कुसल मेंडिस (५९) आणि कामिंडू मेंडिस (नाबाद २३) यांनी सातव्या विकेटसाठी ३६ धावा जोडल्या आणि संघाची धावसंख्या २५० धावांच्या जवळ नेली.
अविष्का फर्नांडोला सामनावीर तर दुनिथ वेललागेला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा