अहमदनगर | विजय मते
आजच्या पिढीवर चांगले संस्कार होण्याची गरज, पालक मुलांना शाळेत घालून मोकळे होतात, शिक्षक पुर्वीसारखे जीव तोडून शिकवत नाहीत, विद्यार्थ्यांना त्यांची जबाबदारी समजत नाही, शाळेत फळ्यावर सुविचार लिहितांना आपण नेहमी खरे बोलावे, गुरुंविषयी आदर ठेवावा, हे फक्त वाचण्यापुरते आहे, कृतीमधून ते घडत नाही. सध्या मुलांवर अध्यात्मिक संस्काराची गरज आहे. तेव्हा शाळेत सुविचार ऐवजी हरिपाठातील ओवी लिहिण्याची गरज आहे, असे विचार हभप निवृत्तीनाथ महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी समाजप्रबोधनपर किर्तनातून विचार मांडले.
सावेडी उपनगरातील वसंत टेकडी येथे द्वारकामाई साई मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त हभप इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील त्र्यंबके, योगेश पिंपळे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, बबन नांगरे, काळे सर, हभप रवींद्र महाराज आव्हाड, पोळ महाराज आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
हभप इंदोरीकर पुढे म्हणाले, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचे निष्क्रीयता वाढत आहे. सध्या सर्वच क्षेत्रात नितीमत्ता बदलत आहे. त्यामुळे प्रगती ऐवजी अधोगत होत चालली आहे. धर्मावर संकट आहे. तेव्हा धर्म वाचवा. धर्म वाचला तर माणसे वाचतील अन् माणसे वाचली तर संप्रदाय धर्म वाढेल, असे सांगून ते म्हणाले, मी १० वर्षापुर्वी किर्तनातून सांगत होतो. हुंडा प्रथा बंद होईल, लग्नाला मुली मिळणार नाही, ज्या मिळतील त्यांना हुंडा देत लग्न करवून घ्यावे लागेल. ही आज परिस्थिती आहे. आजही पुन्हा सांगतो, अजून पाच वर्षांनी खूप भयावह अवस्था होईल, तेव्हा परमार्थ करा, पैशासाठी रक्ताची नाती तोडू नका. हीच नाती वेळप्रसंगी आपणास उपयोगी येणार असल्याचा मौलिक सल्ला इंदोरीकर महाराज यांनी दिला. मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा.मुलींनी देखील आपल्या आई-वडिलांची सेवा करून त्यांची मान खाली जाणार नाही असे वागावे.
यावेळी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव इंदुरीकर महाराजांनी केला प्रतिष्ठानच्यावतीने सुनील त्र्यंबके यांनी इंदोरीकर महाराजांचा सत्कार करण्यात आला.
कीर्तन सोहळ्यानंतर नितीन कोकणे यांनी साई स्पर्श हा कार्यक्रम सादर करून साईबाबा, शंकर महाराज, स्वामी समर्थ महाराज, यांच्या जीवन चरित्रावर आधारित नाट्य कलाकृती सादर केली. याला देखील उपस्थितांनी मोठी दाद दिली. या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. दरवर्षी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान गुरु पूर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन सुनील त्र्यंबके, योगेश पिंपळे व त्यांचे मित्र मंडळ करत असतात या सर्वांचे कौतुक नागरिकांनी केले.