अहमदनगर | प्रतिनिधी
राष्ट्रीय एकात्मता फेलोशिपचे मानकरी, ‘समाजभूषण’ मानकरी, विविध पुरस्कारार्थी, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तथा अर्बन बँक बचाव समितीचे विष्णुपंत डावरे यांच्याप्रती असलेली सामाजिक कार्याची मंडळाने दखल घेत अभिष्टचिंतन सोहळ्यास गुणगौरव सोहळा म्हटले पाहीजे, असे प्रतिपादन अहमदनगर देवांग कोष्टी समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.डाॅ.दत्ता पोंदे यांनी केले. देवांग कोष्टी समाजसेवा मंडळ संचलित विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान शैक्षणिक उपक्रमातंर्गत सावेडी येथील सामाजिक संकुलात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना विष्णुपंत डावरे म्हणाले, जीवनाच्या वाटा समृद्ध करण्यासाठी शिक्षणाला फार महत्व आहे. प्रत्येक पालकांना वाटते आपला पाल्य शैक्षणिक जीवनात यशस्वी व्हावा. समाजातील आर्थिकदुर्बल घटक शिक्षणापासून वंचित राहू नये. त्याचे स्वप्न साकार व्हावे. ज्ञानाची मर्यादा वाढली जावी म्हणून समाजातील दानशुर व्यक्ती, समाजबांधवांनी आपला वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करावा. समाजाचे देणे लागते या भावनेतून मदतीचा हात द्यावा, असे आवाहन डावरे यांनी यावेळी केले.
विष्णुपंत डावरे यांनी कै.गोविंदराव व कै.सुभद्राबाई डावरे यांच्या स्मरणार्थ ५,०००/- रुपये कृतज्ञतानिधी प्रा. डाॅ. पोंदे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी शैलेंद्र तरवडे, अशोक मंचरकर, मदन लकारे, किशोर भिंगारकर, जगन्नाथ निर्हाळी, सुहास ढुमणे आदि जातीबांधव उपस्थित होते.