अहमदनगर | भगवान राऊत
दिवंगत डॉ. गंगाधर मोरजे यांनी लोकसाहित्याच्या क्षेत्रामध्ये वैश्विक दृष्टिकोन देण्याचे काम केले. लोकसाहित्याचा अभ्यास हा प्रयोगनिष्ठ वाड्मय कलेचा अभ्यास आहे, असे ते मानत असत. त्याचबरोबर साहित्याच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवले पाहिजेत, असा त्यांचा विचार होता, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केले.
दिवंगत साहित्यिक डॉ. गंगाधर मोरजे यांच्या स्मृतिप्रित्यार्थ पद्मगंगा फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. हमाल पंचायत येथील सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमास पद्मगंगा फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर, समिक्षक डॉ. सुधाकर शेलार, डॉ. संदीप सांगळे, डॉ. मुसा बागवान, डॉ. सुनील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. संजीव कुलकर्णी (कथासंग्रह – शास्त्र काट्याची कसोटी), कवयित्री सरोज आल्हाट (काव्यसंग्रह अनन्यता), अंबादास हिंगे (कादंबरी – शिवराम), कृष्णा जाधव (संतसाहित्य – एक तरी ओवी), प्रदिप मेहेंदळे (आत्मकथन), डॉ. हंसराज जाधव (महाराष्ट्रातील परिवर्तनाच्या चळवळी आणि मराठी साहित्य), डॉ. भारत हंडीबाग (गौरवग्रंथ) यांना साहित्य क्षेत्रातील पुरस्कार तर ॲड. विश्वनाथ गोलावर (समाजभूषण), प्रा. डॉ. दत्तात्रय वाघ यांना (आदर्श प्राचार्य), रवींद्र काळे (शैक्षणिक), अविनाश कदम (दर्पण पत्रकारिता), डॉ. सुभाष नागरगोजे (क्रीडारत्न) तर दादा विधाते (समाज भूषण) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. सहस्रबुद्धे पुढे म्हणाले की, डॉ. धोंडीराम वाडकर यांनी आपले गुरुवर्य दिवंगत प्रा. डॉ. गंगाधर मोरजे यांच्या स्मृती प्रित्यर्थ पद्मगंगा फाउंडेशनची स्थापना केली. गेल्या १७ वर्षापासून ते साहित्य, कला, क्रीडा, पत्रकारिता, समाजकार्य व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करतात. या माध्यमातून सबंध समाजाला प्रोत्साहित करण्याचे काम डॉ. वाडकर करतात.
यावेळी डॉ. सुधाकर शेलार, डॉ. संदीप सांगळे, डॉ. मुसा बागवान डॉ. सुनील शिंदे, कवयित्री सरोज आल्हाट, प्राचार्य दत्तात्रय वाघ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. वाडकर यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल बरसमवाड यांनी सूत्रसंचालन केले. तर कल्याणी बरसमवाड यांनी आभार मानले. प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमास साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.