अहिल्यानगर | २५.११ | रयत समाचार
Lokmat petition dismissed: श्रमिक पत्रकाराला कायद्याने संरक्षण आहे. त्यामुळे त्याची बदली कंपनीने सुडबुद्धीने केली असेल तर त्या बदलीस दिवाणी न्यायालयात आव्हान देता येऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.
न्यायमूर्ती संजय ए. देशमुख यांनी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी हा निकाल तोंडी घोषित केला होता. त्याचा लेखी आदेश न्यायालयाने नुकताच पारीत केला आहे. ‘लोकमत’चे अहिल्यानगर आवृत्तीचे निवासी संपादक सुधीर लंके यांची व्यवस्थापनाने १ जुलै २०२६ रोजी अहिल्यानगर येथून मुंबई येथे बदली केली. मात्र ही बदली सूडबुद्धीने आणि अन्यायकारक हेतूने करण्यात आल्याचा आरोप करत लंके यांनी या बदली आदेशाला व बदलीच्या आडून ‘लोकमत’च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरवर्तनाला अहिल्यानगर येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात आव्हान दिले होते. या दाव्यात लोकमतसह, कंपनीचे उपाध्यक्ष (एचआर) बालाजी मुळे, अहिल्यानगरचे सरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
‘लोकमत’ने हा दावा चालविण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला नाही, असा आक्षेप घेत दिवाणी प्रक्रिया संहितेच्या आदेश ७ नियम ११ अन्वये हा दावा फेटाळण्याची मागणी दिवाणी न्यायालयात केली होती. सुनावणीअंती दुसरे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश माधुरी खानवे यांनी लोकमतचा हा आक्षेप फेटाळून दिवाणी न्यायालयाला कार्यक्षेत्र असल्याचा निकाल दिला होता.
दिवाणी न्यायालयात लंके यांच्या वतीने ॲड. जॉन खरात यांनी बाजू मांडली. लंके यांची बदली सुडबुद्धीने करण्यात आली व बदलीची प्रक्रिया राबविताना लोकमतच्या अधिकाऱ्यांनी कायदा हातात घेत लंके यांच्या नागरी व कायदेशीर हक्कांचे देखील उल्लंघन केले असा युक्तिवाद खरात यांनी केला. तो युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने लोकमतचा आक्षेप फेटाळला. लोकमतच्या वतीने ॲड. किशोर देशपांडे यांनी युक्तिवाद केला होता. देशपांडे यांनी नोकरी म्हणजे वैयक्तिक सेवा कराराचा भाग असून त्यात हस्तक्षेप करण्याचा दिवाणी न्यायालयाला अधिकार नाही म्हणून दावा फेटाळणे आवश्यक असल्याचे म्हटले होते.
दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ‘लोकमत’ने उच्च न्यायालयात पुनरीक्षण याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने बदलीचा निर्णय हा नियोक्त्याच्या प्रशासकीय अधिकारक्षेत्रातील विषय असतो. मात्र सेवा कायद्याने संरक्षित असेल तसेच बदलीचा अधिकार नियोक्त्याने अन्य हेतूने किंवा सूडबुद्धीने वापरला असल्यास अशा बदलीला आव्हान देता येते, असे स्पष्ट केले.
सदर बदली व त्यानंतरची कार्यवाही ही काही अधिकाऱ्यांनी सुडापोटी केली आहे याबाबत लंके यांनी दाव्यासोबत दिलेले पुरावेही न्यायालयाने विचारात घेतले. लंके यांच्या नागरी हक्कांचे हनन झाले व अधिकाऱ्यांनी अधिकाराचा दुरुपयोग केला हे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
लंके हे श्रमिक पत्रकाराच्या व्याख्येत येत नाहीत म्हणून त्यांना बदलीला न्यायालयात आव्हान देण्याचा अधिकार नाही, असा दावा ‘लोकमत’ने या खटल्यात केला होता. लंके यांच्या वतीने ॲड. अनिरुद्ध निंबाळकर यांनी बाजू मांडताना ‘लोकमत’चा हा दावा खोडून काढला. लंके हे निवासी संपादक असून श्रमिक पत्रकार आहेत. त्यांना श्रमिक पत्रकार कायद्याचे संरक्षण आहे. इंद्रकुमार जैन प्रकरणातील निकालात उच्च न्यायालयाने महाराष्ट्र मान्यताप्राप्त कामगार संघटना व अनुचित कामगार प्रथा प्रतिबंध अधिनियमातील (MRTU & PULP Act) तरतुदीचा पत्रकार फायदा घेऊ शकत नाहीत, असा निकाल दिला आहे. जेथे अधिकार असतात तेथे कायदेशीर पर्याय देखील असले पाहिजेत हे तत्त्व आहे. त्यामुळे पत्रकारांना बदली विरोधात इतर फोरम उपलब्ध नसतील तर चुकीच्या बदलीला आव्हान देण्यासाठी दिवाणी न्यायालय हाच पर्याय आहे, असे निंबाळकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. निंबाळकर यांना अँड खरात यांनी सहाय्य केले.
न्यायालयाने निंबाळकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरला. उच्च न्यायालयाने लंके हे श्रमिक पत्रकार असून त्यांना श्रमिक पत्रकार कायद्यातील तरतुदी लागू होतात असे महत्त्वपूर्ण निरीक्षणही नोंदविले आहे. लोकमतच्या वतीने ॲड. सचिन डंख यांनी बाजू मांडली.
लंके यांनी आव्हान दिलेली बदलीची कृती दिवाणी न्यायालयात सुनावणीस पात्र असल्याचे उच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिवाणी न्यायालयात आता पुढील सुनावणी सुरु होणार आहे. पत्रकारांना बदलीबाबत कोठे आव्हान देता येईल हे ठरविण्यासाठी हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. निवासी संपादक हे श्रमिक पत्रकार नाहीत या ‘लोकमत’च्या दाव्यावर या निकालात न्यायालयाने महत्त्वपूर्ण भाष्य केल्याने पत्रकारांचा श्रमिक पत्रकार म्हणून दर्जा अबाधित राहण्यासही कायदेशीर आधार म्हणून हा निकाल लक्षवेधी मानला जात आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


