रयत समाचार | १५.११ | भैरवनाथ वाकळे
Miss Cynthia Farrar: अमेरिकेत जन्मलेल्या आणि भारतात स्त्रीशिक्षण व मिशनरी कार्यासाठी योगदान देणाऱ्या सावित्रीबाई यांच्या शिक्षिका असलेल्या मिस् सिंथिया फॅरार यांच्या कौटुंबिक इतिहासाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध झाला आहे. त्यांच्या जन्मतारखेपासून ते वडील, आजोबा आणि भावंडांच्या नावांपर्यंतची माहिती या दस्तऐवजात नोंदविण्यात आली आहे.
अमेरिकन मराठी मिशनच्या इतिहास, महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य आणि महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या प्रारंभीच्या वाटचालीचा अभ्यास करताना मिस् सिंथिया फॅरार (Miss Cynthia Farrar) यांचे नाव विशेष महत्त्वाने समोर येते. त्यांच्या कार्याची माहिती विविध ऐतिहासिक संदर्भांतून उपलब्ध होत असताना आता त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकणारा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज अभ्यासासाठी उपलब्ध झाला आहे.

अमेरिकेतील फॅरार कुटुंबाच्या वंशावळीची नोंद असलेल्या या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या ९१ व्या पृष्ठावर सिंथिया फॅरार यांचा उल्लेख आढळतो. या नोंदीनुसार त्यांचा जन्म २० एप्रिल १७९५ रोजी झाला. त्यांचे वडील फिनेहास फॅरार (Phinehas Farrar) हे होते. फिनेहास फॅरार यांचा जन्म १२ नोव्हेंबर १७७१ रोजी झाला होता. त्यांनी १७ मे १७९४ रोजी न्यू हॅम्पशायर राज्यातील मार्लबरो येथील अबिगेल स्टोन (Abigail Stone) यांच्याशी विवाह केला होता.
या दाम्पत्याच्या अपत्यांमध्ये सिंथिया यांचा पहिला क्रमांक असल्याची नोंद दस्तऐवजात आहे. विशेष म्हणजे सिंथिया यांच्या नावापुढे ‘Missionary at Bombay’ अर्थात ‘मुंबई येथे मिशनरी म्हणून कार्यरत’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे अमेरिकेतील त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबरोबरच भारतातील मिशनरी कार्याचीही या नोंदीतून पुष्टी मिळते.
दहा भावंडांमध्ये सिंथिया ज्येष्ठ : फिनेहास आणि अबिगेल फॅरार यांच्या एकूण दहा अपत्यांची माहिती या दस्तऐवजात दिली आहे. त्यामध्ये सिंथिया यांच्यानंतर चार्ल्स, नॅन्सी, फिलिंडा, एलिझाबेथ, एडमंड, रुथ, मिनोट, कॅरोलिन आणि ल्यूथर व्हिटमन यांचा समावेश आहे.
चार्ल्स यांचा जन्म १६ नोव्हेंबर १७९६ रोजी झाला. त्यांनी डॉर्कस कूलिज यांच्याशी विवाह केला. नॅन्सी यांचा जन्म २० ऑक्टोबर १७९८ रोजी झाला असून त्यांनी जुलै १८१७ मध्ये असा होलमन यांच्याशी विवाह केला.
फिलिंडा यांचा जन्म २४ फेब्रुवारी १८०१ रोजी झाला. त्यांनी ४ एप्रिल १८२० रोजी जॉर्ज एच. लेन यांच्याशी विवाह केला. त्या बोस्टन येथे राहत असल्याची नोंद आहे. एलिझाबेथ यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८०२ रोजी झाला, तर एडमंड यांचा जन्म १६ नोव्हेंबर १८०४ रोजी झाला. एडमंड यांनी टेनेसी राज्यातील कोलंबिया येथील हॅरिएट अॅन कॅचडेल यांच्याशी विवाह केला होता.
रुथ यांचा जन्म ८ ऑगस्ट १८०७ रोजी झाला. त्यांनी मिनोट लेन यांच्याशी विवाह केला आणि त्या डेट्रॉईट येथे राहत होत्या. मिनोट यांचा जन्म २२ सप्टेंबर १८१० रोजी झाला. त्यांनी मेबेल बार्न्स यांच्याशी विवाह केला होता. कॅरोलिन यांचा जन्म २१ मार्च १८१३ रोजी झाला असून १७ डिसेंबर १८३४ रोजी त्यांचे निधन झाले. सर्वांत धाकटे ल्यूथर व्हिटमन यांचा जन्म १४ सप्टेंबर १८१७ रोजी झाल्याची नोंद आहे.
फॅरार कुटुंबाची विस्तृत वंशावळ : या दस्तऐवजात सिंथिया यांचे आजोबा फॅरार यांच्या इतर मुलांचीही माहिती दिलेली आहे. जॉन फॅरार हे त्यांचे दुसरे पुत्र होते. मिस् सिंथीया यांचे चुलते. त्यांचा जन्म २४ ऑगस्ट १७७३ रोजी झाला. त्यांनी १७९६ मध्ये सिंथिया स्टोन यांच्याशी विवाह केला. सिंथिया स्टोन यांचे निधन १८३० मध्ये झाले. ल्यूथर, कॅल्विन, नॅन्सी, बेट्सी, बुलाह आणि जॉर्ज अशी त्यांच्या सहा अपत्यांची नावे नोंदविण्यात आली आहेत. तिसरे पुत्र कॅल्विन फॅरार यांचा जन्म जानेवारी १७७८ मध्ये झाला. त्यांनी ब्रिमफिल्ड येथील बाथशेबा बर्ट बेट्स यांच्याशी विवाह केला. ते अमेरिकेतील मेन राज्यातील वॉटरफोर्ड येथे राहत होते. त्यांचे निधन ९ फेब्रुवारी १८१९ रोजी झाल्याची नोंद आहे.
स्त्रीशिक्षणाच्या इतिहासाच्या अभ्यासाला नवी दिशा : मिस् सिंथिया फॅरार यांच्या कौटुंबिक इतिहासाची ही नोंद त्यांच्या चरित्राच्या अभ्यासाला महत्त्वपूर्ण आधार देते. आतापर्यंत त्यांच्या भारतातील मिशनरी कार्याचा, मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचा आणि महाराष्ट्रातील शैक्षणिक इतिहासातील योगदानाचा अभ्यास केला जात आहे. आता त्यांच्या जन्मतारखेची, वडिलांची, आईची आणि नऊ भावंडांची नावे असलेली वंशावळीची नोंद उपलब्ध झाल्याने त्यांच्या जीवनचरित्राचा एक महत्त्वाचा भाग स्पष्ट होण्यास मदत झाली आहे.
विशेष म्हणजे, २० एप्रिल १७९५ ही जन्मतारीख आणि ‘मुंबई येथे मिशनरी’ असा उल्लेख असलेली ही नोंद सिंथिया फॅरार यांच्या भारतातील कार्याची ऐतिहासिक ओळख अधिक ठोस करते.
अमेरिकेतील ऐतिहासिक अभिलेख, मिशनरी संस्थांचे दस्तऐवज आणि महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांचा इतिहास यांचा परस्परसंबंध जोडून संशोधन केल्यास सिंथिया फॅरार यांच्या जीवनकार्याचे अनेक नवे पैलू उजेडात येऊ शकतात. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या इतिहासाचा शोध घेताना त्यांच्या कौटुंबिक इतिहासाची ही नोंद निश्चितच महत्त्वाची ठरणार आहे.
संदर्भ : फॅरार कुटुंबाच्या वंशावळीचा ऐतिहासिक दस्तऐवज, पृष्ठ क्रमांक ९१; Honorable Old Age – A Discourse, १८४७.
(अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळ, अहिल्यानगर)
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


