MPSC Success Story Maharashtra: अध्यात्मिक प्रगतीसोबत शैक्षणिक प्रगतीवरही भर द्या : आयआरएस ओंकार खुंटाळे - Rayat Samachar

MPSC Success Story Maharashtra: अध्यात्मिक प्रगतीसोबत शैक्षणिक प्रगतीवरही भर द्या : आयआरएस ओंकार खुंटाळे

अर्जुन दारकुंडे राज्यकर अधिकारीपदी, तर दीपक बोठे जॉइंट डायरेक्टरपदी; निंबळक ग्रामस्थांकडून जावयांच्या संघर्षमय प्रवासाचा गौरव

rayatsamachar
5 Min Read
Subeditor | Dipak Shirsath

अहिल्यानगर | १३.११ | दिपक शिरसाठ

MPSC Success Story Maharashtra: निंबळक, ता. अहिल्यानगर येथील बी. डी. कोतकर यांचे जावई अर्जुन दशरथ दारकुंडे यांची महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागात राज्यकर अधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्दल, तसेच मुरलीधर कोतकर यांचे जावई दीपक आप्पासाहेब बोठे यांची भारतीय सैन्यदलात १९ वर्षे देशसेवा केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून जॉइंट डायरेक्टर, अकाउंट्स अँड ट्रेझरी कार्यालय, ठाणे येथे नियुक्ती झाल्याबद्दल निंबळक ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार, ता. १२ नोव्हेंबर रोजी जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आयआरएस अधिकारी ओंकार खुंटाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना आयआरएस अधिकारी ओंकार खुंटाळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आध्यात्मिक प्रगतीसोबतच शैक्षणिक प्रगतीवरही विशेष भर दिला पाहिजे. शिक्षण हे यशाचे महत्त्वाचे साधन असून विद्यार्थ्यांनी केवळ घोकंपट्टी किंवा पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता वैचारिक गुणवत्ता, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान विकसित करावे. आगामी काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे महत्त्व वाढणार असल्याने काळानुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे. अभ्यासाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील प्रशासकीय सेवेत मोठे यश संपादन करू शकतात, असे त्यांनी सांगितले.

MPSC

अर्जुन दशरथ दारकुंडे यांनी प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत शिक्षणाची जिद्द कायम ठेवली. शिक्षण घेत असताना कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांनी प्रिंटिंग प्रेसमध्ये काम केले. त्यानंतर तहसील कार्यालयात अर्धवेळ काम केले. पुण्यात उच्च शिक्षण घेत असताना महाविद्यालयाच्या मेसमध्ये वेटर म्हणूनही काम करून त्यांनी शिक्षणाचा खर्च भागवला. दिवसभर काम आणि उरलेल्या वेळेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, अशा संघर्षातून त्यांनी २०१७ मध्ये एमपीएससी परीक्षेत यश मिळवत जीएसटी विभागात प्रवेश केला. सातत्यपूर्ण मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर त्यांना राज्यकर अधिकारीपदी पदोन्नती मिळाली. त्यांचा हा प्रवास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
दीपक आप्पासाहेब बोठे यांनी भारतीय सैन्यदलातील आर्मर्ड कॉर्प्समध्ये तब्बल १९ वर्षे देशसेवा केली. सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेतीमध्ये लक्ष घालत डाळिंब बागेची उभारणी केली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करून एमपीएससी परीक्षेत यश मिळवले. त्यांची जॉइंट डायरेक्टर, अकाउंट्स अँड ट्रेझरी कार्यालय, ठाणे येथे नियुक्ती झाली. देशसेवेनंतरही नव्या क्षेत्रात जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवण्याची त्यांची वाटचाल कौतुकास्पद असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
प्रा. भानुदास कोतकर यांनी दोन्ही सत्कारमूर्तींचे अभिनंदन करताना निंबळक गावासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. गावातील तरुण एमपीएससी आणि यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय पदांवर पोहोचत आहेत. अशा यशस्वी व्यक्तींच्या सत्कारातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. दोन्ही सत्कारमूर्तींनी यापुढेही मोठे यश संपादन करून गावाचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
माजी उपसरपंच घनश्याम म्हस्के यांनी शेतकरी कुटुंबातून येऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे सांगितले. गावातील विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांकडे वळावे, असे आवाहन केले.
प्रा. रावसाहेब गावखरे यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. केवळ पुस्तके जवळ ठेवण्यापेक्षा त्यांचा सातत्याने अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी चांगली संगत ठेवून अभ्यासाची सवय लावावी, असे त्यांनी सांगितले.
बाळासाहेब कोतकर यांनी अर्जुन दारकुंडे यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक करताना आई-वडिलांचे संस्कार आणि कुटुंबाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. अर्जुन यांनी भविष्यात आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय ठेवावे, अशा शुभेच्छा दिल्या. तसेच दीपक बोठे यांनी १९ वर्षांच्या सैन्यसेवेनंतरही स्पर्धा परीक्षेत मिळवलेले यश आणि आई-वडिलांप्रती असलेली सेवा व जबाबदारी विशेष कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना दीपक बोठे यांनी सैन्यदलातील १९ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्ती घेतली. त्यानंतर शेतीमध्ये प्रगती केली आणि मित्रपरिवारातील व्यक्तींच्या प्रेरणेतून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. मेहनतीच्या जोरावर यश मिळवता आले. मामाच्या गावात ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेला हा सत्कार आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचे सांगत त्यांनी आई-वडील आणि दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळेच प्रगती झाल्याची भावना व्यक्त केली. ग्रामीण भागातील तरुणांनी यशस्वी व्यक्तींच्या अनुभवातून प्रेरणा घ्यावी आणि पालकांनी मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले.
पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी दोन्ही सत्कारमूर्तींच्या यशाचे कौतुक करत निंबळक आणि पंचक्रोशीसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. गावातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्याची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी राहुल कांडेकर, उद्योजक राजेंद्र भोर, दीपक शिंदे, भाऊसाहेब शिंदे, राजेंद्र कोतकर, महेश म्हस्के, मारुती कोतकर, ज्ञानेश्वर डहाळे, संदीप कोतकर, संजय कोतकर, बबन बर्वे, दादा झुगे, बापू कोतकर, सुजय कोतकर, हर्षवर्धन कोतकर, नाना कोतकर, सचिन कोतकर, प्रशांत मदने, हरीष कळसे, सुधाकर काळे, नंदकुमार कोतकर, शिवाजी दिवटे, अंबादास कोतकर, शिवाजी कोतकर, सदाशिव कोतकर, राजेंद्र खुंटाळे, राम शिंदे, दादाभाऊ दळवी, सार्थक कोतकर, राहुल कोतकर,नाना डोईफोडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब कोतकर यांनी केले, तर सूत्रसंचालन बाळासाहेब कोतकर यांनी केले.

सविस्तर वाचा : सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षिका सिंथिया फरार यांच्या समाधीचा नगरमध्ये शोध, जाणून घ्या त्यांचं कार्य

- Advertisement -


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading