अहमदनगर | १७ जून | रयत समाचार
Public issue: नागापूर चौक ते निंबळक बायपासपर्यंत चौपदरीकरण झालेल्या रस्त्यावर विविध कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात वाहनांची पार्किंग केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातांचे प्रमाण वाढल्याची गंभीर बाब समोर आली आहे. संबंधित कंपन्यांनी तातडीने स्वतःच्या आवारात वाहनतळाची व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी दिला आहे.
नागापूर ते निंबळक बायपास हा रस्ता यापूर्वी अत्यंत खराब अवस्थेत होता. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते आणि रस्ता अरुंद असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. दिलीप पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण करण्यात आले.
सध्या हा रस्ता अधिक सुरक्षित आणि सुकर झाला असला तरी काही कंपन्यांनी फुटपाथ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेचा वापर वाहन पार्किंगसाठी सुरू केला आहे. अनेक ठिकाणी अवजड वाहने, क्रेन, रोलर तसेच कर्मचाऱ्यांची वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी आणि गर्दीच्या काळात अपघाताचा धोका अधिक वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. नागापूर-निंबळक मार्ग हा राज्य महामार्ग दर्जाचा असून या मार्गावरील सन फार्मा, क्रॉम्प्टन, जेएम इंडस्ट्रीज, लॉरिट्झ नुडसन (एल अँड टी) आदी कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून वाहन पार्किंग कंपनीच्या आवारात करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र याबाबत जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दुसरीकडे, काही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना कंपनीच्या आवारात वाहने उभी करण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे सार्वजनिक रस्त्यांवरच वाहनांची पार्किंग केली जात आहे. यामुळे पादचारी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
या मार्गावर नियमित गस्त घालणाऱ्या वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांकडूनही या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप डॉ. पवार यांनी केला आहे. अनेक वेळा पोलिस प्रशासनाला याबाबत सूचना देऊनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
येत्या दोन दिवसांत अनधिकृत पार्किंग करणाऱ्या कंपन्यांवर आणि संबंधित वाहनधारकांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डॉ. दिलीप पवार यांनी दिला आहे.
प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित कंपन्यांवर तातडीने कारवाई करावी तसेच सार्वजनिक रस्ते आणि फुटपाथवरील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
हे हि वाचा :Cultural Politics | ‘वैदिकीकरण’ ही प्रवृत्ती वारंवार डोके वर का काढते आहे, संजीव सोनवणी यांचा सवाल
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


