पारनेर | १६.६ | रयत समाचार
(Ngo) राळेगण सिध्दीचे समाजसेवक आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते किसन बाबुराव तथा आण्णा हजारे यांच्या स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी ट्रस्टतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सामाजिक गौरव पुरस्कार’ यावर्षी शांतीवनच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी प्रदान करण्यात आला, अशी माहिती दिपक नागरगोजे यांनी दिली.
(Ngo) यावेळी नागरगोजे म्हणाले, हा पुरस्कार स्वीकारताना शांतीवन परिवारासाठी कृतज्ञता, अभिमान आणि आनंदाचा अविस्मरणीय क्षण अनुभवता आला.
(Ngo) अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात अण्णा हजारे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी हभप भास्करगिरी महाराज पेसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला, तर पद्मश्री पोपट पवार प्रमुख उपस्थित होते.
शांतीवनच्या कार्याला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे अण्णा हजारे यांनी दिलेली कौतुकाची थाप असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून शांतीवनच्या प्रत्येक सहकाऱ्याचा, दात्यांचा, हितचिंतकांचा आणि संपूर्ण शांतीवन परिवाराचा असल्याचे सांगण्यात आले.
सुमारे २७ वर्षांपूर्वी बाबा आमटे, रविंद्रनाथ टागोर, विनोबा भावे आणि अण्णा हजारे यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन सुरू झालेल्या सेवाकार्याचा हा गौरव असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. संघर्ष, साधना, सेवा आणि समर्पणाच्या प्रवासाला मिळालेली ही महत्त्वपूर्ण पावती असल्याचेही नमूद करण्यात आले.
विशेष म्हणजे अण्णा हजारे यांना विविध पुरस्कारांतून प्राप्त झालेल्या रकमेतून स्थापन झालेल्या ट्रस्टमार्फत आणि अण्णांच्या हस्तेच हा पुरस्कार स्वीकारण्याचा दुर्मीळ योग आल्याने हा क्षण अधिकच संस्मरणीय ठरला.
या सन्मानामुळे समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांसाठी अधिक समर्पितपणे कार्य करण्याची प्रेरणा आणि नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तसेच अण्णा हजारे, स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी ट्रस्ट, उपस्थित मान्यवर आणि शांतीवनवर प्रेम करणाऱ्या सर्व व्यक्तींचे दिपक नागरगोजे यांनी आभार मानले.
Cultural Politics | एकात्मिक मानववाद, ढोंगाचा बाजार आणि पंडीत दीनदयाळ यांची फसवणूक
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



