Ad imageAd image

Health | कफ सिरप आता फक्त परवानाधारक औषधविक्रेत्याकडूनच विक्री; सरकारी लगाम ?

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नवी दिल्ली | १६.६ | रयत समाचार

(Health) केंद्र सरकारने कफ सिरपच्या विक्रीबाबत महत्त्वाचा निर्णय घेत देशभरातील लहान गावांना मिळणारी विशेष सवलत रद्द केली. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने औषधे नियम, १९४५ मध्ये सुधारणा करून कफ सिरपची विक्री आता केवळ परवानाधारक औषधविक्रेत्यांकडूनच करण्याचे बंधनकारक केले.

(Health) आरोग्य मंत्रालयाने २९ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अनुसूची ‘के’ मधील नोंद क्रमांक १३(७) मध्ये बदल करण्यात आला असून, त्यातून ‘सिरप’ हा शब्द वगळण्यात आला आहे. यापूर्वी १,००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये परवानाधारक औषधविक्रेता उपलब्ध नसल्यास काही अटींवर कफ सिरप विक्रीस सवलत होती. मात्र नव्या सुधारणेमुळे ही सवलत पूर्णपणे रद्द करण्यात आली.

(Health) या निर्णयामुळे आता देशातील सर्व गावांमध्ये कफ सिरपची विक्री व वितरण औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० तसेच संबंधित नियमांचे पालन करूनच करावे लागणार आहे. कफ सिरप खरेदीविक्रीसाठी परवानाधारक औषधविक्रेत्याची अट अनिवार्य राहणार.
कफ सिरपच्या वापरावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवणे, त्याचा संभाव्य गैरवापर रोखणे आणि सार्वजनिक आरोग्य व सुरक्षिततेला अधिक बळकटी देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
तसेच औषध उत्पादक, वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांनी संबंधित कायदे व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देशही मंत्रालयाने दिलेत.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading