Cultural politics | हिंदीसक्तीला अखेर ब्रेक; मराठी अभ्यास केंद्राच्या आंदोलनाला यश; कायम रद्दची मागणी कायम

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | ६.५ | रयत समाचार

(Cultural politics) महाराष्ट्रातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील हिंदी भाषा परीक्षेच्या सक्तीविरोधात मराठी अभ्यास केंद्राने उभारलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी संबंधित परीक्षेला स्थगिती देण्याची घोषणा केली. गरज पडल्यास परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याचाही विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयानंतर मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.

 

(Cultural politics) परीक्षा कायमस्वरूपी रद्द झाली तरच मंत्रिमहोदयांचे शंभर टक्के अभिनंदन करता येईल, असे सांगत त्यांनी हिंदीसक्ती विरोधातील लढा पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.

(Cultural politics) काल- परवा सामाजिक माध्यमांवर डॉ. दीपक पवार यांनी राज्यातील राजपत्रित व अराजपत्रित कर्मचाऱ्यांना हिंदी परीक्षा देण्याच्या सक्तीविरोधात भूमिका मांडली होती. त्यानंतर माध्यमांनी या प्रश्नाची दखल घेतली. मराठी अभ्यास केंद्राने परिपत्रकाची होळी करण्याचा इशाराही दिला होता. याच पार्श्वभूमीवर मनसेनेही आक्रमक भूमिका घेतली. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या पाठिंब्याबद्दल डॉ. पवार यांनी आभार व्यक्त केले.
राज्य शासनाच्या भाषा संचालनालयाने ता. २८ जून २०२६ रोजी मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे हिंदी भाषा निम्न व उच्च श्रेणी परीक्षा आयोजित केली होती. मात्र, मराठी ही राज्याची राजभाषा असताना हिंदी परीक्षेची सक्ती करण्यामागील औचित्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
मराठी आणि हिंदी भाषांमध्ये साधर्म्य असल्याने व्यवहारात अडचण येत नाही. हिंदी महाराष्ट्राची राजभाषा नाही. मग कर्मचाऱ्यांचे हिंदी ज्ञान तपासण्यासाठी परीक्षा घेण्याची गरज काय? असा सवाल डॉ. दीपक पवार यांनी उपस्थित केला. तसेच तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात किंवा पश्चिम बंगालसारख्या बिगर हिंदी राज्यांमध्ये अशा परीक्षा घेतल्या जात नाहीत, मग महाराष्ट्रातच हिंदी सक्ती का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अमराठी कर्मचाऱ्यांच्या मराठी ज्ञानावर भर देण्याऐवजी हिंदी परीक्षांसाठी शासन वेळ आणि पैशांचा अपव्यय करत असल्याचा आरोपही करण्यात आला.
डॉ. पवार पुढे म्हणाले, हिंदीच्या देशांतर्गत वसाहतवादाचा बीमोड करण्यासाठी कायम सावध राहण्याची गरज आहे. पुढची लढाई ‘हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती’चे महाराष्ट्रातील अस्तित्व संपवण्याची असेल. प्रत्यक्ष कृतीत सहभागी व्हा.
दरम्यान, हिंदी परीक्षा स्थगित झाल्याने मराठी भाषिक संघटनांमध्ये समाधान व्यक्त होत असले, तरी परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्यासाठीचा दबाव पुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading