छत्रपती संभाजीनगर | २३.४ | रयत समाचार
(India news) पीपल्स एज्युकेशन सोसायटी (PES)च्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंदाजे ₹१०० कोटींच्या अपहारप्रकरणी अखेर शासन स्तरावर हालचाल सुरू झाली असून, या गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. ‘सेव्ह पीईएस’ आंदोलनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर तंत्रशिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
(India news) तंत्रशिक्षण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशानुसार एसजीजीएस नांदेडचे संचालक डॉ. एम.बी. कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून, २४ एप्रिल २०२६ पर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
(India news) न्यायालयीन आदेश डावलल्याचा आरोप : संस्थेतील रंगनाथ व मोरे गटातील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर मा. उच्च न्यायालयाने ४ एप्रिल २०१३ रोजी दिलेल्या आदेशानुसार महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि कर भरण्याची जबाबदारी संचालकांकडून विभागीय सहसंचालकांकडे सोपविण्यात आली होती. ही व्यवस्था ऑक्टोबर २०१७ पर्यंत सुरळीत सुरू होती. मात्र, नोव्हेंबर २०१७ मध्ये तत्कालीन संचालक डॉ. अभय वाघ यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर कोणत्याही शासकीय किंवा न्यायालयीन आदेशाशिवाय ही व्यवस्था थांबविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
९ वर्षांत संशयास्पद व्यवहार : ‘सेव्ह पीईएस’च्या मते, २०१७ पासून प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर यांनी न्यायालयाने दिलेले अधिकार स्वतः वापरले. यामुळे मागील ९ वर्षांत सुमारे रकिकम रूपये १०० कोटींचे व्यवहार संशयास्पद पद्धतीने झाले असून, अपहार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. ही बाब देवरे समितीच्या १३ जानेवारी २०२३ च्या अहवालातून समोर आली होती. तसेच, डिसेंबर २०२५ मधील तंत्रशिक्षण खात्याच्या पत्रातूनही ही माहिती पुन्हा उघडकीस आली.
अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी : या प्रकरणात तत्कालीन संचालक डॉ. अभय वाघ, सहसंचालक महेश शिवणकर, डॉ. उमेश नागदिवे तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ‘सेव्ह पीईएस’ने शासनाकडे केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेत अशा प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे.
निष्पक्ष चौकशीची अपेक्षा : चौकशी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने व्हावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दोषी आढळणाऱ्या आजी व माजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
समाजाला आवाहन : या लढ्यात समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ‘सेव्ह पीईएस’ मूव्हमेंटचे इंजि. अविनाश कांबळे यांनी केले. अधिक माहितीसाठी 8888363060 / 9881556609, ई-मेल [email protected] वर संपर्क साधावा.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
