अहमदनगर | २१.४ | रयत समाचार
(Cultural Politics) छत्रपती शिवरायांच्या राज्यात ‘३५० वा शिवराज्याभिषेक’ वर्षानिमित्त शासनाने सर्व शासकीय पत्रव्यवहार आणि कार्यक्रमांमध्ये विशेष लोगो वापरणे बंधनकारक केले असतानाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छापत्रात या लोगोचा अभाव दिसून आल्याने वाद निर्माण झाला. या प्रकरणामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
(Cultural Politics) भाजपा नेते भानुदास बेरड यांचा मुलगा चि. विवेक यांच्या विवाहप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासकीय पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. मात्र हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यात छत्रपती शिवरायांचा ‘३५० वा शिवराज्याभिषेक’ लोगो नसल्याचे स्पष्ट झाले. शासनाच्या स्पष्ट निर्देशांनंतरही हा लोगो वापरला गेला नसल्यामुळे “छत्रपती शिवरायांना जाणूनबुजून ‘बायपास’ केले का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
(Cultural Politics) महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ता. २४ जुलै २०२३ रोजी काढलेल्या शासननिर्णयानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त तयार करण्यात आलेले अधिकृत बोधचिन्ह सर्व शासकीय कार्यक्रम, प्रसिद्धी साहित्य आणि पत्रव्यवहारात वापरणे अनिवार्य करण्यात आले. तसेच सर्व शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागावरही हा लोगो प्रदर्शित करण्याचे निर्देश देण्यात आले.
या निर्णयामागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, शौर्य आणि स्वराज्याच्या विचारांचा व्यापक प्रसार करण्याचा उद्देश असल्याचे शासनाने स्पष्ट केले होते. मात्र, प्रत्यक्षात मुख्यमंत्री स्तरावरच या निर्णयाचे पालन झाले नाही, अशी टीका होत आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे शिवप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांकडून नाराजी व्यक्त होत असून, शासनाने याबाबत स्पष्टीकरण द्यावे आणि अशा त्रुटी पुन्हा होऊ नयेत, अशी मागणी होत आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.

