मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) ८.६.२४ टी२० विश्वचषक २०२४ चा १४ वा सामना शनिवारी अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने किवींचा ८४ धावांनी पराभव करत सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत मोठा धक्कादायक निकाल दिला आहे. या विजयासह राशिद खानचा संघ क गटातील गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. दोन सामने जिंकून त्यांच्या खात्यात चार गुण जमा झाले आहेत, तर किवीज पहिल्याच सामन्यात पराभवामुळे शेवटच्या स्थानावर आहेत. अफगाणिस्तानने मोठा अपसेट करत सुपर-८ साठी आपला दावा मजबूत केला आहे.
गयानाच्या प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तान संघाने २० षटकांत ६ बाद १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १५.२ षटकांत ७५ धावांत सर्वबाद झाला. अफगाणिस्तानने राशिद खान आणि फजलहक फारुकी यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर किवीजचे कंबरडे मोडले.
टी२० विश्वचषकाच्या इतिहासात अफगाणिस्तानने १०वा मोठा अपसेट घडवला. यापूर्वी अमेरिकेने चालू स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करून सर्वांनाच चकित केले होते. ६ जून रोजी खेळलेला सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला होता. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या अमेरिकेने १८ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या फलंदाजांना केवळ १३ धावा करता आल्या. टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील हा नववा अपसेट होता.
१६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किवी संघ ७५ धावांत सर्वबाद झाला. फजलहक फारुकीने संघाला पहिला धक्का दिला. पहिल्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर त्याने फिन ऍलनला त्रिफळाचीत केले. तो खाते न उघडताच तंबूमध्ये परतला. या सामन्यात किवी संघाचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. डेव्हॉन कॉनवे ८, डॅरिल मिशेल ५, केन विल्यमसन ९, मार्क चॅपमन ४, मायकेल ब्रेसवेल ०, ग्लेन फिलिप्स १८, मिचेल सँटनर ४, मॅट हेन्री १२, लॉकी फर्ग्युसन २ धावा करून बाद झाले. त्याचवेळी ट्रेंट बोल्ट ३ धावा करून नाबाद राहिला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. फजलहक फारुकी आणि राशिद खानने प्रत्येकी चार तर मोहम्मद नबीने दोन विकेट घेतल्या.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ६ गडी गमावून १५९ धावा केल्या. या सामन्यात रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १०२ धावांची स्फोटक भागीदारी झाली. मॅट हेन्रीने संघाला पहिला धक्का दिला. त्याने झाद्रानला त्रिफळाचीत केले. त्याला तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४४ धावा करता आल्या. यानंतर हेन्रीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजमतुल्ला ओमरझाईला आपला बळी बनवले. तो २२ धावा करून तंबूमध्ये परतला. या सामन्यात सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजने स्फोटक कामगिरी केली. त्याने ५६ चेंडूत ८० धावा केल्या. यादरम्यान त्याने १४२.८५ च्या स्ट्राईक रेटने पाच चौकार आणि तेवढेच षटकार मारले. या सामन्यात रशीद खान ६ धावा करून बाद झाला तर गुलबदिन नायब शून्य धावा करून बाद झाला. तर, करीम १ धाव घेऊन नाबाद राहिला आणि नजीबुल्ला १ धाव घेऊन नाबाद राहिला. किवी संघाकडून बोल्ट आणि हेन्रीने प्रत्येकी दोन बळी घेतले तर लॉकी फर्ग्युसनला एक यश मिळाले.
रहमानउल्ला गुरबाज सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.