मुंबई | १५.४ | रयत समाचार
(Rip news) ग्वाल्हेर घराण्याच्या जगप्रसिद्ध शास्त्रीय गायिका नीला भागवत यांचे मंगळवारी ता. १४ एप्रिल रोजी अल्पश: आजाराने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे शास्त्रीय संगीतक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, कला व सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
(Rip news) नेहमी प्रसन्न, हसतमुख आणि संगीतासाठी अखंड झटणाऱ्या नीला भागवत यांनी वयाच्या उत्तरार्धातही संगीत साधना अखंड सुरू ठेवली होती. त्या दररोज पहाटे उठून रियाज करत असत. ग्वाल्हेर घराण्याची परंपरा जपत त्यांनी शास्त्रीय संगीताबरोबरच लोकसंगीतालाही तितक्याच ताकदीने सादर केले.
(Rip news) त्या कॉ. तारा रेड्डी यांच्यासोबत दीर्घकाळ कार्यरत होत्या आणि भारतीय महिला फेडरेशनच्या सक्रिय सभासद होत्या. महिला चळवळीशी जोडलेल्या त्यांच्या कार्यामुळे त्या केवळ गायिका नव्हत्या, तर सामाजिक भान जपणाऱ्या एक जागरूक व्यक्तिमत्त्व होत्या. ‘महिला आंदोलन’ पत्रिकेतून तसेच ‘युगांतर’ साप्ताहिकातून त्यांनी संगीत विषयक लेखनही केले.
देश-विदेशात त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले असून त्यांचा संगीत गोतावळा मोठ्या प्रमाणात होता. त्यांच्या गायकीत परंपरा आणि प्रगत विचारांचा सुंदर मिलाफ दिसून येत असे.
ता. ८ मार्च २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध क्षेत्रातील महिला कलाकारांना एकत्र आणून त्यांनी पुरोगामी विचारांचे सादरीकरण घडवून आणले होते. हा कार्यक्रम भारतीय महिला फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने पार पडला होता. तसेच, ता. १७ जानेवारी २०२६ रोजी त्यांना प्रतिष्ठेचा ‘वसंतोत्सव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांच्या संगीत क्षेत्रातील दीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाची पावती होता.
भारतीय महिला फेडरेशनच्या मुंबई कमिटीच्या डॉ. अनुराधा रेड्डी यांनी त्यांच्या निधनाची माहिती देताना, नीला भागवत यांनी शेवटपर्यंत सामाजिक भान जपले आणि संगीताद्वारे समाजाशी नाळ जोडून ठेवली, असे सांगितले.
नीला भागवत यांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीतविश्वाने एक संवेदनशील, अभ्यासू आणि सामाजिक जाण असलेली गायिका गमावली आहे. भारतीय महिला फेडरेशनतर्फे त्यांना क्रांतिकारी व विनम्र अभिवादन करण्यात आले.
Biodiversity | अहिल्यानगरचा ‘किंगफिशर’ आता पाण्याच्या बाटलीवर; ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.

