मुंबई | २३.३ | रयत समाचार
(Politics) ‘सर्वपक्षीय कृपा’ या नावाखाली भोंदूगिरीला समर्थन दिले जात असल्याचा आरोप फेटाळत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भोंदू बाबाबुवांना कधीही पाठिंबा दिला नाही, उलट अशा अंधश्रद्धेविरोधात आम्ही नेहमीच आघाडीवर राहिलो आहोत, अशी परखड प्रतिक्रिया भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड ॲड. सुभाष लांडे यांनी दिली.
(Politics) लोकसत्ताने प्रसिद्ध केलेल्या ‘सर्वपक्षीय कृपा’ या बातमीवर टीका करताना कॉम्रेड लांडे म्हणाले, भोंदू अशोक खरात प्रकरणात सर्वच राजकीय पक्षांना एकाच पातळीवर ठेवणे चुकीचे आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भूमिका ही इतर भांडवली पक्षांपेक्षा मूलतः वेगळी असून आम्ही कधीही अशा भोंदूगिरीला खतपाणी घातलेले नाही.
(Politics) ते पुढे म्हणाले, विज्ञाननिष्ठ आणि भौतिकवादी दृष्टिकोनातून कम्युनिस्ट पक्षाने नेहमीच अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीविरोधात लढा दिला आहे. अशा प्रकारच्या शोषणाचा सातत्याने पर्दाफाश करत जनजागृती केली आहे.
लोकसत्ताने खोडसाळपणे कम्युनिस्ट व इतर डाव्या पक्षांना ‘सर्वपक्षीय’ गटात समाविष्ट करून सत्याचा विपर्यास केला आहे. ज्या पक्षांनी खरातला राजकीय संरक्षण दिले, त्यांच्या भूमिकेला आमचा ठाम विरोध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसत्ताने त्वरित खुलासा करावा, कम्युनिस्ट व डावे पक्ष वगळून ‘सर्वपक्षीय’ म्हणावे, अन्यथा हा हेतुपुरस्सर केलेला अपप्रचार ठरेल, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
विज्ञानवाद आणि अंधश्रद्धेविरोधातील लढा यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू ठेवणार असून भोंदूगिरीला कोणत्याही राजकीय संरक्षणाला विरोध केला जाईल, असा इशाराही कॉ. सुभाष लांडे यांनी दिला.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
