History | आर्किटेक्चर्स यांना सुवर्णसंधी : वारसा संवर्धनासाठी ‘साईट मॅनेजमेंट प्लॅन स्पर्धा’ जाहीर

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | १०.३ | रयत समाचार

(History) महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्मारकांचे संवर्धन आणि शास्त्रीय व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. ‘साईट मॅनेजमेंट प्लॅन (SMP) स्पर्धा २०२६‘ या खुल्या स्पर्धेच्या माध्यमातून M.Arch (Conservation) पदवीधारक तरुण वास्तुविशारदांना ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आपले कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

(History) या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पात्र वास्तुविशारदांना महाराष्ट्रातील संरक्षित स्मारकांसाठी स्थळ व्यवस्थापन आराखडा (Site Management Plan) तयार करण्याची संधी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेत उत्कृष्ट काम करणाऱ्या वास्तुविशारदांना पुरातत्त्व विभागाच्या नामांकित (Empanelled) यादीत समाविष्ट होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे तरुण संवर्धन वास्तुविशारदांना व्यावसायिक क्षेत्रात नवे दालन खुले होणार आहे.

(History) पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, पुणे व रत्नागिरी विभागाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असून यामुळे ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी नवीन कल्पना, आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समोर येण्यास मदत होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा उपक्रमांमुळे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येईल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी दिलेल्या गूगल फॉर्म लिंकवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ अशी आहे. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रे व दोन पासपोर्ट साईज फोटो जोडून सहाय्यक संचालक (पुरातत्त्व), विभागीय कार्यालय, पुणे येथे सादर करावेत.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी खालील लिंकवर अर्ज करावा :
https://forms.gle/VLmgbC9Nghy3dH169

या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्मारकांचे संवर्धन अधिक प्रभावीपणे होईल आणि तरुण संवर्धन वास्तुविशारदांना आपल्या कल्पना प्रत्यक्षात साकार करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading