उत्सववार्ता | २.३ | प्राचार्य प्रकाश वाकळे
(Culture) भारतीय सण- उत्सव हे केवळ श्रद्धा, रूढी आणि धार्मिक आचारांपुरते मर्यादित नसतात. त्यांच्या मुळाशी जीवनशास्त्र, पर्यावरण आणि समाजव्यवस्थेचे भान दडलेले असते. मराठी फाल्गुन महिन्यात येणारी होळी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी साजरी होणारी रंग पंचमी ही त्याचीच जिवंत उदाहरणे आहेत.
(Culture) रंग, आनंद आणि उत्साहाच्या आवरणामागे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा दृढ पाया आहे. हे लक्षात घेणे आज अधिक आवश्यक ठरते. हिवाळ्याचा शेवट आणि उन्हाळ्याची चाहूल हा काळ शरीरासाठी संवेदनशील असतो. वातावरणातील तापमानातील चढउतारामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. अशा वेळी होळीच्या अग्नी प्रज्वलनाची परंपरा ही केवळ पौराणिक कथांचा भाग नसून परिसरातील साचलेला कचरा जाळून स्वच्छता राखण्याची सामूहिक पद्धत होती. अग्नीमुळे निर्माण होणारी उष्णता वातावरणातील सूक्ष्म जंतूंना आळा घालण्यास सहाय्यभूत ठरत असे. सार्वजनिक आरोग्याची ही एक लोकपरंपरेतील उपयुक्त उपाययोजना होती.
(Culture) होळीमध्ये नव्या धान्याचे कणसे, गव्हाच्या ओंब्या, हरबरा भाजण्याची प्रथा ही कृषिसंस्कृतीशी जोडलेली आहे. नव्या पिकाची चाचणी घेणे, त्यातील आर्द्रता कमी करणे आणि पचनसुलभ बनविणे. या सर्व गोष्टींना वैज्ञानिक आधार आहे. अन्नसुरक्षेचे भान आपल्या पूर्वजांना होते. हे यावरून स्पष्ट होते.
रंगपंचमीचा विचार केला तर आज रासायनिक रंगांच्या अतिरेकामुळे त्वचेचे आणि पर्यावरणाचे नुकसान होत असले तरी परंपरेत वापरले जाणारे रंग नैसर्गिक होते. पळस (पलाश), हळद, चंदन, मेंदी यांसारख्या वनस्पतींपासून तयार होणारे रंग त्वचेसाठी हितकारक होते. काही रंगांमध्ये जंतुनाशक व थंडावा देणारे गुणधर्मही आढळतात. रंगांच्या खेळामध्ये शरीराची हालचाल, हास्य- विनोद, सामूहिक सहभाग यांमुळे मानसिक ताण कमी होतो आणि सकारात्मकता वाढते. आधुनिक मानसशास्त्रही सामूहिक उत्सवांचे मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम मान्य करते. या सणाचा सामाजिक पैलूही तितकाच महत्त्वाचा आहे. होळीच्या रंगांत भेदभाव विरघळतात. जाती- पाती, धर्म- पंथ श्रीमंती- गरीबी यांच्या भिंती काही काळासाठी तरी नाहीशा होतात. सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश या सणातून दृढ होतो. समाजातील दुरावे कमी करण्याची ताकद सणांमध्ये असते. याच उत्तम उदाहरण होळी रंगपंचमी हा सण.
आजच्या काळात या सणांचे स्वरूप बदलताना दिसते. ध्वनीप्रदूषण, रासायनिक रंगांचा अतिरेक, पाण्याची उधळपट्टी, हेवेदावे, द्वेषमत्सर या गोष्टी परंपरेतील वैज्ञानिकतेला हरवून टाकतात. म्हणूनच होळी- रंगपंचमी साजरी करताना ‘पर्यावरणपूरक दृष्टीकोन स्वीकारणे’ ही काळाची गरज आहे. नैसर्गिक रंगांचा वापर, मर्यादित पाणी वापर, स्वच्छता आणि सुरक्षितता यांचा आग्रह धरला पाहिजे.
परंपरेतील विज्ञान ओळखून सण साजरे करणे हीच खरी सांस्कृतिक प्रगल्भता ठरेल.
होळी- रंगपंचमीचा संदेश केवळ रंगांचा नाही तर शुद्धीकरणाचा, नवचैतन्याचा आणि सामाजिक ऐक्याचा आहे. ‘विज्ञान आणि संस्कृती यांचा सुंदर संगम जपणे’ हेच या सणाचे खरे महत्त्व होय.

(लेखक परभणीस्थित वसुंधरा महिला महाविद्यालय, टाकळी (कुं) येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत)
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
