पुणे | २३.१ | रयत समाचार
(Politics) ज्येष्ठ राजकीय अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांच्या ‘राजकारण जिज्ञासा’ या नव्या पुस्तकाच्या निमित्ताने महाराष्ट्र, देश तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणातील बदलते प्रवाह, न्यायव्यवस्था आणि राजकारणातील परस्परसंबंध यांवर सखोल चर्चा करणारा परिसंवाद शनिवारी ता.२४ जानेवारी रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
(Politics) ‘देश-विदेशातील राजकारण कोणत्या दिशेने जात आहे?’ या मध्यवर्ती विषयावर होणाऱ्या या परिसंवादात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींचे विश्लेषण केले जाणार आहे. तसेच न्यायव्यवस्था आणि राजकारण यांच्यातील परस्पर संबंध, लोकशाही मूल्यांची सद्यस्थिती आणि राजकीय व्यवस्थेतील बदल यावरही विचारमंथन होणार आहे. या परिसंवादात विविध क्षेत्रांतील अभ्यासक व पत्रकार सहभागी होत आहेत.
(Politics) आरती मोरे महाराष्ट्रातील राजकारणावर आपले मत मांडणार असून, अभिजीत कांबळे दिल्लीच्या राजकीय घडामोडींच्या दृष्टिकोनातून देशातील राजकारणाचा आढावा घेणार आहेत. आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक संकल्प गुर्जर भारताची शेजारी राष्ट्रे तसेच युरोप- अमेरिकेतील राजकीय घडामोडी स्पष्ट करतील. तर विधी क्षेत्रातील अभ्यासक प्रा. प्रतापसिंह साळुंखे न्यायव्यवस्था आणि राजकारण यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्यावर प्रकाश टाकणार आहेत तर समारोपात पुस्तकाचे लेखक प्रा. सुहास पळशीकर हे आपले विचार मांडणार आहेत.
संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत, एम. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे येथे होणाऱ्या या परिसंवादाला प्रवेश मुक्त ठेवण्यात आला आहे. बदलत्या राजकीय वास्तवाचे सखोल आकलन करून घेण्याची संधी देणारा हा परिसंवाद पुण्यातील अभ्यासक, विद्यार्थी आणि जागरूक नागरिकांसाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
