India news | संचार साथी ॲप अनिवार्य?; नागरिकांच्या गोपनीयतेवर सरकारचा घाला- सतेज डी. पाटील यांचा इशारा

उपसंपादक | दिपक शिरसाठ

कोल्हापूर | ०२.१२ | रयत समाचार

(India news) मोबाईलमध्ये संचार साथी ॲप प्री-इन्स्टॉल करणे बंधनकारक करणाऱ्या केंद्र सरकारच्या निर्णयावर तीव्र टीका करताना सतेज डी. पाटील यांनी हा निर्णय ‘प्रत्येक भारतीयाच्या गोपनीयता व डिजिटल स्वायत्ततेस गंभीर धोका’ असल्याचा इशारा दिला आहे.

(India news) केंद्र सरकारने Telecom Cyber Security Rules 2024 (संशोधित) अंतर्गत सर्व मोबाईल हँडसेटमध्ये हे ॲप अनिवार्य करणे अनिवार्य केले, या पार्श्वभूमीवर पाटील यांनी कठोर भूमिका मांडली.

(India news) पाटील म्हणाले, एका साध्या पडताळणीसाठी, फोनच्या अंतर्गत प्रणालीवर नियंत्रण मिळवू शकणारे, न काढता येणारे ॲप बसवणे ही गंभीर चूक आहे. हे नागरिकांच्या डिजिटल आयुष्यावर सरकारी हस्तक्षेप वाढवण्याचे दारच उघडते.

ते पुढे म्हणाले की, असा ॲप प्री-इन्स्टॉल केल्यामुळे भविष्यात त्याचा अनियंत्रित वापर, तांत्रिक पाळत, प्रत्येकाच्या हालचालींवर नजर ठेवण्याची भीती निर्माण होते. यामुळे सरकारला नागरिकांची हेरगिरी करण्याचा मार्ग मोकळा होईल, हे लोकशाहीला घातक आहे, असे ते म्हणाले.

पाटील यांनी हा निर्णय भारतीय संविधानातील गोपनीयतेच्या हक्काला (Right to Privacy) आणि वैयक्तिक स्वातंत्र्याला धक्का देणारा असल्याचेही स्पष्ट केले. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, असा सावधानतेचा इशाराही त्यांनी दिला.

नागरिकांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी केंद्राने उपाययोजना करणे योग्य असले तरी अशाप्रकारे जबरी ॲप इन्स्टॉलेशन करणे हा उपाय नसल्याचे त्यांनी नमूद केले.

 

Share This Article