(Entertenment) सज्जनगड येथील रामदास गोसावी यांच्या विचारसरणीशी संबंधित ग्रंथाचे नाव वापरून तयार होत असलेल्या ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाच्या पोस्टरवरुन निर्माण झालेल्या वादानंतर सज्जनगड येथील श्रीरामदास स्वामी संस्थानच्या सूर्याजी गवालाक्ष स्वामी यांनी अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनात संस्थानने स्पष्ट इशारा देत म्हटले, श्री समर्थ रामदास स्वामींच्या पवित्र नावाचा उपयोग व्यावसायिक चित्रपटासाठी करणे अत्यंत अनुचित आणि अपमानास्पद आहे.
(Entertenment) संस्थानने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले, श्री समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील भक्ती, ज्ञान, आणि पराक्रम यांचे प्रतीक आहेत. त्यांच्या ग्रंथांचे, शिकवणीचे आणि नावाचे व्यावसायिक वा मनोरंजनात्मक वापर करणे हे त्यांच्या आदर्शांच्या विरोधात आहे. संस्थानने पुढे स्पष्ट केले की, संबंधित चित्रपट निर्मात्यांनी “समर्थ रामदास स्वामी” या नावाचा उल्लेख चित्रपटाच्या शीर्षकात किंवा प्रचारमाध्यमांत केला असल्यास, तो तत्काळ मागे घेण्यात यावा. अन्यथा हा प्रकार स्वामींच्या स्मृतीचा व परंपरेचा अपमान मानला जाईल.
(Entertenment) संस्थानचे प्रतिनिधी सूर्याजी गवालाक्ष स्वामी यांनी निवेदनात नमूद केले आहे की, समर्थ परंपरेच्या नावाने कोणत्याही प्रकारे सिनेमातील विकृत विचार वा शिकवणीचा वापर होऊ नये. जर असा गैरवापर झाला, तर तो सर्व समर्थभक्तांच्या भावना दुखावणारा आणि संतसाहित्यास अपमान करणारा ठरेल. संस्थानने पुढे सांगितले की, सध्याच्या काळात सोशल मीडियावर ‘समर्थ’ या नावाखाली विविध चुकीचे संदेश प्रसारित होत आहेत. त्यामुळे समर्थ परंपरेतील अनुयायांनी विवेकाने वर्तन करावे आणि संतांचे नाव व ग्रंथ हे फक्त ज्ञान, भक्ति आणि प्रेरणेसाठीच वापरावेत, असे आवाहन करण्यात आले.
संस्थानच्या निवेदनात शेवटी नमूद केले आहे की, संतांच्या नावाचा वापर मनोरंजनासाठी नव्हे, तर जनजागृतीसाठी व्हावा. समर्थांच्या शिकवणीतील ‘जनता वाद देवाद सांगून द्यावा, जनी सुखसंवाद घडवू द्यावा’ या उपदेशाचे पालन सर्वांनी करावे. सज्जनगड संस्थानने समर्थ रामदास स्वामींच्या नावाचा चुकीचा वापर थांबवावा, अशा तीव्र शब्दात इशारा दिला असून, संबंधित चित्रपटाचे नाव तातडीने बदलण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, याविषयी प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे म्हणाले, मनाचे श्लोक चित्रपटाचं नाव बदलावावं म्हणून हिंदू जनजागृती आणि हिंदू महासंघाचा विरोध. हे अती होतंय. सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिल्यावर मग अशा घटनाबाहृय सत्ताकेंद्र बनू बघणाऱ्यांची मान्यता घ्यायची का? मग सेन्सॉर बोर्ड पाहिजेच कशाला? मग आता काय सिनेमाचे नाव बदलवून, ‘मन्नाचे श्लोक’ असं करावं का?
भारतीय संविधानातील मूल्य न मानणाऱ्या, अभिव्यक्ती व मुक्तविचारांना बाधा पोहोचविणाऱ्या अश्या प्रत्येक प्रसंगी आमची वकिलांची टीम सहकार्य करतेय. हिंदू जनजागृती आणि हिंदू महासंघ जे कुणी असतील त्यांनी कशाचा काहीही अर्थ काढण्याचे म्हणजे ‘त्यांच्याच मनाचे श्लोक’ चालणार नाहीत. त्यांनी एकत्र येऊन संविधान वाचावे व अभिव्यक्ती स्वातंत्र्य समजून घ्यावे. त्यांना विरोध करण्याचा अधिकार आहे पण दहशत निर्माण करण्याचा नाही. सिनेमा तर प्रसारित होणारच.