स्मृतिवार्ता
गोवा | १६ मार्च | दशरथ का. परब
(Goa news) माजी पोलिस उपअधीक्षक, नामवंत उद्योजक तथा गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे माजी अध्यक्ष संतोबा देसाई यांचे निधन ही गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी आहे. माझे अतिशय जवळचे मित्र आणि मार्गदर्शक असलेले संतोबा देसाई यांच्या अकस्मिक जाण्याने माझीही वैयक्तिक हानी झाली. वय झाल्यानंतर एक ना एक दिवस प्रत्येकाला हे जग सोडून जावेच लागते. पण संतोबा देसाई हे सरकारी निवृत्त झाल्यानंतर देखील सतत नवनव्या उपक्रमात व्यस्त राहणारे उत्साही व्यक्तिमत्त्व. त्यामुळे अशा कार्यरत असलेल्या व्यक्तीचे जाणे हे अधिक वेदनादायी असते.
(Goa news) संतोबा देसाई यांचा जन्म सत्तरीतील ठाणे गावचा. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या संतोबा देसाई यांनी पोर्तुगीज काळात अगदी तरुण वयात पोलिस दलात नोकरी करायला सुरूवात केली. एक साधा शिपाई ते पोलिस उपअधीक्षक हा त्यांचा प्रवास म्हणजे सचोटी आणि प्रामाणिकपणा यांचा अतिशय दूर्मिळ योग. दोन भाऊ आणि पाच बहिणी अशा मोठ्या परिवारात जन्मलेल्या संतोबांनी आपल्या भावंडांची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. पोलिस खात्यात असताना ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसी वचनाचे त्यांनी आयुष्यभर पालन केले. ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ आणि गरीब जनतेचे कैवारी’ अशी त्यांची शेवटपर्यंत प्रतिमा होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणांची यशस्वी सोडवणूक केली. त्यांच्या निधनामुळे गोवा पोलिस दलाने एक अनुभवी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी गमावला.
(Goa news) संतोबा देसाई यांनी सरकारी जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार तर पाडल्याच पण त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीचे भान कायम जागे ठेवले. या जाणीवेतूनच त्यांनी गोव्यातील समाज बांधवांसाठी काम करायला सुरूवात केली. गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे ते दोनवेळा अध्यक्ष बनले. संतोबा देसाई यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत क्षत्रिय मराठा समाजाची अनेक कामे मार्गी लागली. पर्वरी येथील भव्य मराठा संकुलाची उभारणी संतोबा देसाई यांच्याच काळात झाली. संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांना त्यांनी चालना दिली. गुणवंत विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत केली.
सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर बहुसंख्य लोक ‘निवृत्तीचा काळ सुखाचा म्हणत आराम करण्यात वेळ घालवत’ असतात. पण संतोबा देसाई यांच्या शब्दकोशात ‘निवृत्ती’ हा शब्दच नव्हता. पोलिस खात्यातून निवृत्त होताच त्यांनी फोंड्यात सिमेंट फॅक्टरी सुरू केली. बांधकाम व्यवसायाला लागणारे सर्व साहित्य ते पुरवायचे यातून अनेक युवकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला. पुढे त्यांच्या चिरंजीवांनी हा व्यवसाय भरभराटीस आणला.
गुरूकूल ही संस्था सुरू करून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात वेगळे पाऊल टाकले. त्यांची कन्या हा शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे चालवत आहे. सामाजिक कार्याबरोबरच राजकीय क्षेत्रात देखील संतोबा कार्यरत राहिले. भारतीय जनता पक्षात प्रवेश करून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. भाजपच्या गोवा राज्य कार्यकारिणीत सहभागी होऊन ते उपाध्यक्ष झाले. भाजपचे उमेदवार म्हणून पर्ये मतदारसंघातून त्यांनी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या विरोधात दोन वेळा निवडणूक लढवली. राजकीय विचारसरणी वेगळी असूनही प्रतिस्पर्धी म्हणून प्रतापसिंह राणे यांच्याबद्दल त्यांनी कधीही कटुता बाळगली नाही. संतोबा देसाई यांची प्रतिमा म्हणून नेहमीच अजातशत्रू अशी राहिली. अशा या अष्टपैलू कर्तृत्वाच्या मित्राला माझी आदरांजली.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.