नगरतालुका | १४ मार्च | दिपक शिरसाठ
(Public issue) संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची प्रलंबित असणारे प्रकरणे ताबडतोब मंजुर करावे. तालुक्यात गटनिहाय कॅम्प घेण्यात यावे. योजेनेतील मंजुर लाभार्थ्यांना ताबडतोब लाभ मिळावा या मागणीसाठी आज तहसील कार्यालयात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. तीन दिवसांपूर्वी याबाबतचे निवेदन देऊन पंचायत समितीचे मा. उपसभापती डॉ.दिलीप पवार, मा. सभापती रामदास भोर, गुलाब शिंदे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार ता.१३ मार्च रोजी नगर तहसील येथे आंदोलन करण्यात आले.
(Public issue) यावेळी मागण्या मान्य करत नायब तहसीलदार गणेश भानवसे यांनी सकारात्मक चर्चा केली. तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना संबंधीत विभागाच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे ता. ११ मार्च रोजी याबाबत तहसीलदार संजय शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आली. मात्र याची दखल न घेतल्यामुळे शिवसेनेच्या वतीने नगर तहसील कार्यालयासमोर ठिय्या देत आंदोलन करण्यात आले.
(Public issue) संबंधीत विभागात नेमणुक केलेले कर्मचारी इतरत्र काम करतात. मीटिंग होऊनही प्रकरणे मंजूर-नामंजुर माहिती लाभार्थ्यांना मिळत नाही. उलट लाभार्थ्यांना उद्धट भाषा वापरली जाते. प्रकरणे जमा करताना कर्मचारी उपस्थित नसतात. खातेपुस्तिका भरून दिल्यानंतरही तीन-तीन महिने लाभ मिळत नाही. खातेपुस्तिकेची पोहोच दिली जात नाही, त्याचे रेकॉर्डही मिळून येत नाही. अनेक लाभार्थ्यांची संगणकातील माहिती चुकीची भरली जाते, त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना या चुकांचा फटका बसतो. पर्यायाने लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होतात. या तक्रारी आंदोलकांकडून करण्यात आल्या.
त्यानुसार ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांचा लाभ तात्काळ वर्ग करावा. मीटिंग झाल्याबरोबर आठ दिवसांत खातेपुस्तिका जाऊन आपल्याकडे मागे आली पाहिजे. मीटिंगमध्ये मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना एक महिन्याच्या आत लाभ मिळावा. मंजुर लाभार्थ्यांच्या व लाभ बंद झालेल्यांच्या योग्य कारणासह याद्या मिळाव्यात. तसेच मंडलनिहाय कॅम्प घेऊन लाभार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविल्या जाव्यात. या मागण्या करत प्रलंबित प्रकरणांना लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा यावेळी आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आली.
आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, माजी सभापती संदिप गुंड, नवनाथ काळे, बी.डी. कोतकर, कैलास लांडे, रावसाहेब बेरड, विठ्ठल हंडोरे, विजय टकले यांच्यासह जवळपास शंभरपेक्षा जास्त लाभार्थी उपस्थित होते. त्यात दिव्यांग, विधवा महिला,ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता.
यावेळी नायब तहसीलदार गणेश भानवसे यांनी सांगितले, मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्यासमवेत गावनिहाय कॅम्प घेऊन लाभार्थ्यांच्या अडी-अडचणी सोडवून त्यांना लाभ दिले जातील.
हे ही वाचा : साहित्यवार्ता | नाथसंप्रदायातील मंत्रतंत्र – टी. एन. परदेशी