Rip news | ख्यातनाम चित्रकार सुरेशचंद्र आवारी यांचे निधन; कलाक्षेत्रावर शोककळा

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अकोले | ३.२ | रयत समाचार

(Rip news) राष्ट्रीय पारितोषिक विजेते ख्यातनाम चित्रकार सुरेशचंद्र भाऊराव आवारी (वय ७४) यांचे ता.२ रोजी रात्री ९.४० वाजता मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कला क्षेत्रासह अकोले तालुक्यावर शोककळा पसरली असून, ही हानी भरून न निघणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.

(Rip news) अकोले तालुक्यातील इंदुरी या छोट्याशा गावात जन्मलेल्या आवारी यांनी आपल्या प्रतिभा, चिकाटी आणि साधनेच्या बळावर मुंबईच्या व्यापक कलाविश्वात स्वतंत्र ठसा उमटवला. ‘मुंबई लोकल’ या विषयावरील त्यांच्या चित्राला नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते. त्यांनी मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे काही वर्षे अध्यापन केले. तसेच मुंबईतील प्रतिष्ठित जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन झाले होते.

(Rip news) आवारी यांची चित्रशैली वैशिष्ट्यपूर्ण व स्वतंत्र होती. व्यक्तिचित्रांबरोबरच ग्रामीण जीवनातील श्रमसौंदर्य, शेतकरी संस्कृती, निसर्गाची शांत लय, डोंगर-दऱ्यांची रचना आणि मानवी भावविश्वाचे सूक्ष्म पदर त्यांच्या कलाकृतींमधून प्रकर्षाने दिसून येत. मृदू पण अर्थपूर्ण रंगछटा, शिस्तबद्ध रेषा आणि भावनिक खोली ही त्यांच्या शैलीची ओळख होती. त्यांच्या चित्रांतून ग्रामीण माणसाची अस्मिता, निसर्गाशी नाते आणि जगण्यातील संघर्ष-अभिमान सजीवपणे व्यक्त होत असे.
मोठा लौकिक मिळूनही त्यांचे व्यक्तिमत्त्व साधे, नम्र व निगर्वी राहिले. मितभाषी स्वभाव असूनही त्यांच्या कलेतून ते खूप काही बोलत. विविध पुरस्कारांनी सन्मानित होऊनही त्यांनी यशाला अहंकार होऊ दिला नाही.
आवारी यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून अकोले तालुक्याचा नावलौकिक राज्य व राष्ट्रीय पातळीवर पोहोचवला. आज कला क्षेत्रातील एक तेजस्वी तारा निखळला असला, तरी त्यांचे चित्रविश्व व कलादृष्टी पुढील पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील.
मंगळवारी ता. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता इंदुरी (ता. अकोले) येथील प्रवरा तिरी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती भाऊ चासकर यांनी दिली.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading